अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

By Admin | Updated: January 2, 2015 00:17 IST2015-01-01T23:21:55+5:302015-01-02T00:17:52+5:30

द्राक्ष बागायतदार धास्तावले : ज्वारी, गहू, हरभरा, करडई पिकांना मात्र दिलासा

Farmer Havildars With Diminished Rainfall | अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी बुधवारी रात्री तसेच गुरूवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल पिकांसाठी उपयुक्त असला तरी, द्राक्ष आणि डाळिंब या फळपिकांसाठी हानीकारक आहे. त्यामुळे फळ बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.
जत : जत शहर आणि परिसरात बुधवारी रात्री एक व पहाटे पाचच्यादरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे झाले, परंतु पाऊस पडला नाही. दुपारी हवेत उकाडा तर सायंकाळी गारवा जाणवत होता. रात्री एक वाजण्याच्यादरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. पंधरा-वीस मिनिटे पाऊस झाला आहे. आज (गुरुवार) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दमट वातावरण आहे. वातावरणात अचानक बदल होऊन एक आठवड्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. त्यामुळे फळबागांवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट निर्माण होणार आहे, असे मत द्राक्ष उत्पादक शेतकरी सोपान शिंदे (जत) यांनी व्यक्त केले.
सोनी : दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने मिरज पूर्वभागातील द्राक्ष बागायतदार हबकला आहे. पावसाने द्राक्षमण्यांना तडा गेला असून पावसामुळे दावण्या रोगाचा फैलावही वाढला असल्याने शेतकऱ्यांना परत फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून या पावसामुळे जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, तासगाव, कवठेमहांकाळ ,पलूस परिसरातील द्राक्षपट्ट्यात पाऊस पडल्याने द्राक्ष बागायतदारअडचणीत आला आहे. सध्या मिरज पूर्वभागातील द्राक्ष हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तासगाव परिसरात काही प्रमाणात द्राक्षे विक्रीयोग्य झाली असून, पावसामुळे परिपक्व द्राक्षमण्यांना काही प्रमाणात तडे गेले आहेत. दावण्या, भुरी व फळकुजीही झाली असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांतून चिंतेचे वातावरण कायम आहे. हवामानातील सततच्या बदलांमुळे शेतकरी वैतागला असून, द्राक्ष उत्पादकांचा औषधांचा खर्च गतवर्षीपेक्षा दुप्पट झाला आहे. लिंगनूर : मिरज तालुक्यातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे परिसरात अवकाळी पावसाने पुन्हा तोंड वर काढले. आज सायंकाळी बेळंकी व कोंगनोळी परिसरातही पंधरा मिनिटे पाऊस पडला. तसेच दोन दिवसांपासून सकाळी धुके व दिवसभर ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांत निर्माण झालेली घबराट कायम आहे. आज लिंगनूर परिसरातही दिवसभर ढगाळ हवामान होते, पण पाऊस झाला नाही. तरीही बागायतदारांत धाकधुक निर्माण झाली आहे. खानापूर : खानापूर पूर्व भागात बुधवारी रात्रीपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदिल बनला आहे. खानापूर पूर्व भागातील पळशी, हिवरे, करंजे, बेणापूर, बलवडी येथील निर्यातक्षम द्राक्षबागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्येही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदाचा हंगाम पूर्ण होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारीही दिवसभर वातावरण ढगाळ राहून पावसाची रिमझिम सुरूच होती. या पावसाने रब्बीमधील गहू, शाळू पिकांना फायदा होणार आहे, तर हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने धडाका सुरु केला असून, आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार यांचे धाबे दणाणले आहेत.बुधवारी रात्री तालुक्याच्या करोली (टी), अग्रण धुळगाव, हिंगणगाव, रांजणी, कोकळे परिसरात पहाटे अवकाळी पावसाने दणका दिला. तसेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी अवकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, तर द्राक्षे व डाळिंब पिकाला मोठा फटका बसणार आहे.ढालगाव : ढालगाव, नागजसह परिसरातील लंगरपेठ, चुडेखिंडी आदी गावात वादळी वाऱ्यासह आज (गुरुवारी) अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्षबागांसह ज्वारी, मका आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास काही ठिकाणी अर्धा तास पाऊस झाला. जोराचा वारा असल्याने चुडेखिंडीत विजय शितोळे यांचे तीन एकर ज्वारीचे पीक भुईसपाट झाले, तर द्राक्षबागांतील घडात पाणी साचून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच गहू, मका यासारख्या पिकांचेही मोठे नुकसान परिसरात झाले आहे.कवठेएकंद : तासगाव शहरासह तालुक्यातील कवठेएकंद, नागाव कवठे, मणेराजुरी, सावळजसह परिसरात पावसाने आज (गुरुवारी) दुपारी हजेरी लावली. अवेळी पडलेल्या या पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. आज दुपारी तासगाव शहरासह परिसरात अर्धा तास पावसाच्या सरी पडल्या. काही भागामध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. प्रामुख्याने काढणीला आलेल्या काळ्या द्राक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. संकेतस्थळावर पावसाचे अनुमान केले असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmer Havildars With Diminished Rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.