उमदी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:28+5:302021-07-03T04:18:28+5:30
उमदी : उमदी (ता. जत) येथील रमेश मारुती शेवाळे (वय ४५) या शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जास कंटाळून आत्महत्या केली. ...

उमदी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
उमदी : उमदी (ता. जत) येथील रमेश मारुती शेवाळे (वय ४५) या शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जास कंटाळून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली आहे.
उमदी येथे रमेश शेवाळे यांची सहा एकर शेती आहे. यात तीन एकर द्राक्ष शेती आहे. दोन वर्षांपूर्वी पाऊस कमी असल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे रमेश शेवाळेंनी शेतात बोअर मारण्याचा निर्णय घेतला. बोअर व शेतीच्या कामासाठी त्यांनी कर्नाटक, सोलापूर व गावातील सावकाराकडून कर्ज घेतले होते. पण शेतीतून योग्य उत्पन्न न मिळाल्याने सावकाराचे कर्ज थकीत गेले होते. हे कर्ज वसुलीसाठी सावकारांचा तगादा सुरू होता. या निराशेतून त्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता; पण त्या वेळी काही नागरिकांच्या दक्षतेमुळे त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न फसला होता.
शुक्रवारी दुपारी उमदी-सलगर रस्त्यावर उमदी बस स्थानकापासून १ किलोमीटर अंतरावर रामबाण या ठिकाणी ते गेले. तेथील शेतात चिंचेच्या झाडाला त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. उमदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.