निर्यातीची द्राक्षे बेदाण्याला
By Admin | Updated: April 1, 2015 00:01 IST2015-03-31T22:59:38+5:302015-04-01T00:01:59+5:30
कमी दराचा परिणाम : जत तालुक्यातील चित्र

निर्यातीची द्राक्षे बेदाण्याला
गजानन पाटील - संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यासारख्या संकटांना तोंड देत सांभाळलेल्या द्राक्षबागांमधील द्राक्षांच्या काढणीची धांदल जत तालुक्यात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानाची कारणे सांगून बाजारात द्राक्षाचा दर पाडला आहे.
सध्या द्राक्षाला व्यापारी २५ ते ३0 रुपये किलो असा दर देत आहेत. महागडी औषधे, खते व मशागतीचा खर्च पाहता, हा दर परवडत नसल्याने बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बाजारात विक्री करण्यासाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांचाही बेदाणा केला जात आहे. त्यामुळे बेदाण्याची शेड हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातच रब्बी हंगामाची सुगी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. उमदी, बिळूर, तिकोंडी, संख, करजगी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, जालिहाळ बुद्रुक, भिवर्गी, डफळापूर, मुचंडी, कोंत्येवबोबलाद, बालगाव, हळ्ळी आदी भागांत द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात ५०६० हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा, तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या होत्या. काही बागांना खोड जगविण्याएवढेही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडेफार पाणी होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगवून फळ आणले आहे.
आॅक्टोबरच्या १५ तारखेनंतर व शेवटच्या आठवड्यामध्ये छाटणी घेतली जाते. यावर्षी प्रतिकूल हवामान, ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. महागडी खते, औषधांचा वापर करुन दावण्या, घड, मणी गळीचा प्रतिबंध केला होता. अनेक अडचणींवर मात करीत द्राक्षबागा चांगल्या आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतले आहे. द्राक्षघड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. द्राक्षघडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे.
किमान यंदा तरी द्राक्षांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना १ मार्चला अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच-सहा दिवस सोडून परत अवकाळी पाऊस झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी बाजारात दर पाडला आहे. सध्या बाजारात २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. परंतु सध्या खते, औषधांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. मशागतीचा खर्च वाढला आहे. वीजबिल, मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे शेतकऱ्यांना परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे.
सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई
सध्या द्राक्षांची काढणी, बेदाणा वेचणी, पेटी पॅकिंग, वजन करणे आदी कामे मजुरांकरवी केली जात आहेत. दोन महिने मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष काढणीस महिलेला २०० रुपये, पुरुषाला ३०० रुपये मजुरी, तर बेदाणा वेचणीला किलोला दोन रुपये मजुरी मिळत आहे. एका दिवसाला एक महिला १७५ ते २०० किलो बेदाणा वेचणी करते. सर्वत्र कामे सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई जाणवत आहे.