जतला पाण्यासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार फायद्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:38+5:302021-06-27T04:18:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्नाटकातील स्वतंत्र पाणी योजनेऐवजी म्हैसाळ योजनेची विस्तारित जत उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुराव्याची ...

Expansion of Mahisal scheme for Jatla water is beneficial | जतला पाण्यासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार फायद्याचा

जतला पाण्यासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार फायद्याचा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कर्नाटकातील स्वतंत्र पाणी योजनेऐवजी म्हैसाळ योजनेची विस्तारित जत उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुराव्याची गरज असल्याचा सूर सांगली व्हिजन फोरमच्या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केला. ‘जत तालुका पाणीदार’ या विषयावर परिसंवाद झाला. फोरमचे समन्वयक सुरेश पाटील यांनी आयोजन केले होते. .

सुरेश पाटील म्हणाले, जतला पाण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी तसेच माजी केंद्रीय मंत्री स्व. सिद्धू न्यामगोंडा, आमदार आनंद न्यामगोंडा यांच्याकडे मागणी केली होती. राजापूरपासून पडसलगी बंधाऱ्यापर्यंत दोन लाख एकर ऊस आहे. उन्हाळ्यात कृष्णा कोरडी पडत असल्याने ऊस वाळतो. दरवर्षी दीड हजार कोटींचे नुकसान होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यातील बैठकीनंतर नुकसान टळणार आहे. महाराष्ट्राला चार टीएमसी पाणी मिळण्याने जत व सोलापुरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल.

येरळा सोसायटीचे एन. व्ही. देशपांडे म्हणाले, कर्नाटकमधून पाणी घेण्याचा आमचा प्रस्ताव अत्यंत कमी खर्चाचा आहे. जतच्या सीमेवर आलेले कर्नाटकचे पाणी नैसर्गिक उताराने मिळू शकते. आज कर्नाटकातून ‘तुबची-बबलेश्वर’ योजनेचे पाणी येत आहे. त्याचा अधिकृत करार करणे योग्य ठरेल.

कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे म्हणाले, जतसाठी म्हैसाळ योजनेतूनच पाणीपुरवठा शक्य आहे. कर्नाटकातून पाणी घेण्यावर अनेक मर्यादा आहेत. म्हैसाळच्या विस्तारासाठी आग्रही राहणे हेच जतसाठी शाश्वत पाणी देणारे पाऊल ठरेल.

परिसंवादात आर. एल. कोळी. ॲड. जे. जे. पाटील, सुरेश भोसले, अरुण खंडागळे, म. ह. चव्हाण यांनीही भाग घेतला. स्वागत शाखा अभियंता अविनाश चौगुले यांनी, तर आभार राजगोंडा पाटील यांनी मानले.

चौकट

७०० कोटींचा खर्च

अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक म्हणाले, १०५ गावांसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार झाला आहे. ‘तुबची-बबलेश्वर’मधून महाराष्ट्राने स्वतंत्रपणे स्वखर्चाने योजना करण्याचा प्रस्ताव कर्नाटकने दिला आहे. नव्या कोट्टलगी योजनेत सहभागाचाही प्रस्ताव आहे. त्याऐवजी म्हैसाळचा विस्तार फायदेशीर ठरेल. मल्ल्याळ येथे पाणी टाकून तेथून सर्व गावांना पाणी देता येईल. ‘म्हैसाळ विस्तारित जत योजना’ तिसरा टप्पा या नावाने हा प्रस्ताव तयार सुमारे ७०० कोटींचा खर्च आहे.

Web Title: Expansion of Mahisal scheme for Jatla water is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.