रेल्वेत नोकरीच्या बोगस नियुक्तीपत्रांमुळे खळबळ

By Admin | Updated: April 13, 2015 00:03 IST2015-04-12T22:35:56+5:302015-04-13T00:03:57+5:30

मिरज तालुका : फसवणुकीचा नवा फंडा; असंख्य तरुणांचा समावेश

Excitement due to bogus appointment letters to railway jobs | रेल्वेत नोकरीच्या बोगस नियुक्तीपत्रांमुळे खळबळ

रेल्वेत नोकरीच्या बोगस नियुक्तीपत्रांमुळे खळबळ

मिरज : रेल्वे भरतीच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे प्रकार सुरू असतानाच, आता बेरोजगारांना रेल्वेत नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे पाठवून फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झाला आहे. मिरज तालुक्यातील काहींनी नोकरीसाठी अर्जही न करता त्यांना थेट रेल्वेमंत्र्यांच्या सहीची नियुक्तीपत्रे आली आहेत. काहींनी या पत्रांवर विश्वास ठेवून बँक खात्यावर पैसे जमा केल्याने त्यांची फसवणूक झाली आहे.
बेरोजगारांना रेल्वेत नोकरीचे मोठे आकर्षण आहे. नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊन फसवणुकीचे व बोगस नियुक्तीपत्रे देण्याचे प्रकार घडतात. मात्र भामट्यांनी बेरोजगार तरुणांना रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या नावावर रेल्वेत नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे पाठविली आहेत. दूरध्वनीद्वारे घेतलेल्या मुलाखतीत नोकरीसाठी पात्र ठरला आहात. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कारकून, ग्राहक सेवा प्रतिनिधी, तिकीट कलेक्टर, आदी पदांवर नियुक्ती केली आहे. सोबत उमेदवाराच्या माहितीचा अर्ज दिला असून, हा अर्ज भरून पाठवायचा आहे. मात्र नोकरीसाठी १० ते १२ हजार रुपये अनामत खात्यावर भरण्याची अट आहे.
भारतीय रेल्वेच्या नावाने पाठविलेल्या नियुक्तीपत्रावर रेल्वे भवन बिल्डिंग, पेट्रोल पंपाजवळ नवी मुंबई असा पत्ता असून, एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, दिलेल्या बँक खाते क्रमांकावर अनामत भरायची आहे. नोकरीसाठी दोन दिवसांत अनामत रक्कम रोखीने बँक खात्यावर भरायची असून, दोन दिवसांत रक्कम जमा न केल्यास नियुक्ती रद्द होणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय रेल्वे रोजगार हमी कायद्यांतर्गत राजमुद्रेचा शिक्का व रेल्वेमंत्र्यांच्या सहीने नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे हाती पडल्याने तरुण चक्रावून गेले आहेत.
नियुक्तीपत्रे मिळालेल्या काहींनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, रेल्वेत नोकरी मिळाल्याच्या आनंदात अनामत रक्कम भरलेल्यांची फसवणूक झाली आहे.


रेल्वे दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत रेल्वेत नोकरभरती करण्यात येते. जाहिरातीद्वारे नोकरीसाठी अर्ज मागवून उमेदवारांना निमंत्रण पत्र पाठवून परीक्षा घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखतीनंतर अंतिम निवड होते. त्यानंतर रिक्त जागा असलेल्या विभागाकडे उमेदवारांची यादी पाठविण्यात येते. या विभागाकडून प्रमाणपत्रांची छाननी होऊन त्यांना नियुक्तीपत्र व नियुक्ती देण्यात येते. या भरती प्रक्रियेची माहिती नसलेल्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बोगस नियुक्तीपत्रे पाठविण्याचे प्रकार सुरू आहेत. बेरोजगारांची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रकाराबाबत रेल्वे दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील यांनी सांगितले.


रेल्वेत नोकरीच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये. अधिकृत परीक्षा व मुलाखतीशिवाय कोणालाही नोकरी मिळणे शक्य नाही. बोगस नियुक्तीपत्रे पाठविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे.
-एस. व्ही. रमेश,
स्थानक अधीक्षक, मिरज

Web Title: Excitement due to bogus appointment letters to railway jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.