अखेर टेंभू योजनेचे आवर्तन सुरू
By Admin | Updated: August 18, 2015 00:40 IST2015-08-18T00:40:22+5:302015-08-18T00:40:22+5:30
पावणेचार कोटी थकबाकी : कारखान्यांकडून सव्वादोन कोटी

अखेर टेंभू योजनेचे आवर्तन सुरू
कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोमवारपासून सुरू झाले. यामुळे योजनेच्या ४५०० हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे.
योजनेची ३ कोटी ७५ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. ही वीजबिल थकबाकी तातडीने भरा, अशी नोटीस महावितरणने पाटबंधारे विभागाला दिली आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेली २ कोटी २५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी योजनेकडे जमा केली आहे. शिवाय आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील ५१ लाख रुपये पाणीपट्टी योजनेकडे जमा आहेत. अद्याप कारखान्यांकडून पाणीपट्टी येणेबाकी आहे. ही बाकीसुद्धा भरू, असे कारखान्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील पिके कोमेजून गेली होती. योजनेचे आवर्तन सुरू करा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. योजनेची ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे. यातून ३ कोटी ७५ लाख रुपये वीज थकबाकी भरणे शक्य आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी आवर्तन सुरू केले.
कडेगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी व सांगोला तालुक्यापर्यंत या आवर्तनाचे पाणी दिले जाणार आहे. केन अॅग्रो साखर कारखान्याने १ कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. सोनहिरा कारखान्याने ५० लाख, ग्रीन पॉवर शुगर, गोपुज कारखान्याने २५ लाख रुपये वसूल पाणीपट्टी भरली आहे. शिवाय आटपाडी आणि सांगोला तालुक्यातून ५१ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. अद्यापही विजबिलासाठी १ कोटी कमी पडतात. परंतु कारखान्यांनी उर्वरित वसुली पाणीपट्टी तात्काळ देण्याची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आवर्तनात कोणताही अडथळा येणार नाही. (वार्ताहर)
टंचाईतून आवर्तन मिळणार?
राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून टंचाई काळातील आवर्तन देण्याचा शासन निर्णय झाला आहे. याप्रमाणे ताकारी, टेंभू योजनेचे चालू आवर्तन टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार का? याबाबत लाभक्षेत्रात चर्चा आहे. तसा प्रस्ताव योजनेकडून शासनाकडे गेला आहे. परंतु यावर अंतिम निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.