कोरोना काळातही देशात दागिन्यांची हौस भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:11+5:302021-05-03T04:20:11+5:30
अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाच्या काळात जागतिक स्तरावर सोन्याच्या एकूण मागणीत घट होत असताना सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत ५२ ...

कोरोना काळातही देशात दागिन्यांची हौस भारी
अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या काळात जागतिक स्तरावर सोन्याच्या एकूण मागणीत घट होत असताना सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत ५२ टक्के वाढ झाली आहे. भारतातही दागिन्यांची हौस टिकून असल्याने नव्या वर्षातील पहिल्या तिमाहीत तब्बल ३९ टक्के वाढ नोंदली गेली.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दागिन्यांची हौस पुरविण्यात चीन सर्वांत पुढे आहे. चीनमध्ये २०२१ च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १९४ टक्के वाढ झाली आहे. भारतात जानेवारी ते मार्च २०२१ या पहिल्या तिमाहीत १०२.५ टन दागिन्यांची मागणी नोंदली गेली. त्यात प्रत्यक्ष ग्राहकांची मागणी ३७ टक्क्यांनी वाढली आहे. आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये दागिन्यांच्या मागणीत ६ टक्के घट आहे.
सोन्याच्या दागिन्यांसाठी भारताची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी भारतात दागिन्यांची मोठी उलाढाल होत असते. २०२० च्या पहिल्या तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी ७३.९ टन इतकी होती. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत ती मागणी कोरोनाचा कहर वाढल्यामुळे घटली. त्यानंतर शेवटच्या तिमाहीत ती एकदम १८६.२ टन इतकी नोंदली. तरीही २०२० मध्ये वर्षभरात ४४६.४ टन सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल झाली. २०२१ च्या पहिल्या तिमाहीतही १०२.५ टन मागणी नोंदली गेली आहे. दुसऱ्या व चौथ्या तिमाहीत ती काहीअंशी कमी होण्याची चिन्हे आहेत; पण मागील वर्षापेक्षा यंदा ही मागणी अधिक राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जगात सोन्याच्या ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)मध्ये सर्वाधिक ४७ टक्के वाढ आशिया खंडात नोंदली गेली आहेत. म्हणजेच सोन्याच्या गुंतवणुकीला भारतासह अन्य आशियाई देश प्राधान्य देत आहेत.
चौकट
बिस्किट नाण्यांची मागणी वाढली
भारतात सोन्याचे बार (बिस्किट) व क्वाइन (नाणी) यामध्ये गुंतवणुकीचा कलही वाढला आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२१ मधील पहिल्या तिमाहीत यातील गुंतवणूक ३४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे बँकांमधील सोन्याच्या गुंतवणुकीकडील कल कमी झाला आहे.
चौकट
दरात १४ टक्के वाढ
भारतात मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा २०२१ च्या पहिल्या तिमाहीतील सोन्याच्या दरात १४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. या दरात आणखी वाढ नोंदली जाण्याची शक्यता आहे.