चाळीशी ओलांडली तरी म्हणे, युवा नेताच!
By Admin | Updated: April 7, 2015 01:20 IST2015-04-07T00:23:17+5:302015-04-07T01:20:01+5:30
राष्ट्रवादीतील निवडी : वाळवा तालुकाध्यक्ष पदासाठी नवा चेहरा नसल्याची स्थिती

चाळीशी ओलांडली तरी म्हणे, युवा नेताच!
अशोक पाटील - इस्लामपूर -राष्ट्रवादी वाळवा तालुकाध्यक्ष पदाची निवड १0 एप्रिलपर्यंत होणार असून, यासाठी विद्यमान अध्यक्ष बी. के. पाटील किंवा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्यातरी या पदासाठी तालुक्यात नवा चेहरा दिसत नाही. तिसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्त्यांनी चाळीशी ओलांडली असली तरी, ते स्वत:ला युवा नेतेच म्हणवून घेत आहेत. वाळवा तालुक्यात माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहे. सध्या राजारामबापू उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सोबत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या निवडीही होणार आहेत. पक्षपातळीवर काम करण्यासाठी नव्या आणि युवा चेहऱ्याला संधी देण्याचा विचार जयंतराव करीत असले तरी, तालुक्यात मात्र अजूनही तसा चेहरा दिसत नाही. त्यामुळे विद्यमान जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांना वाळवा तालुकाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील यांना पक्षपातळीवर काम करण्यासाठी संधी देण्यात आली आहे, परंतु त्यामध्ये त्यांना रस नाही. त्यांना आता राजारामबापू, कृष्णा कारखाना अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून जाण्याचे वेध लागले आहेत. त्यांना यामध्ये कितपत यश येते, हे येणारा काळच ठरवेल.
सध्या राष्ट्रवादीची ताकद पाहता, पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. बाळासाहेब पाटील यांनी पक्षासाठी २५ वर्षे वेळ दिला आहे. मध्यंतरीच्या काळात वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी त्यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा होती. युवकांना संधी देण्याच्या धोरणातून विचार केल्यास, संजय पाटील यांना तालुकाध्यक्षपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. या तिघांव्यतिरिक्त तिसऱ्या फळीतील सर्वच कार्यकर्ते चाळीशी ओलांडलेले आहेत, तरीही ते स्वत:ला युवा नेते समजतात. त्यामुळे आता चौथ्या फळीतील युवकांना संधी देण्याचा विचार व्हावा, अशीच मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या मी विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. गेली आठ वर्षे पक्षपातळीवर काम करत आहे. परंतु अध्यक्ष निवडताना सर्वांच्या सोयीनुसार आणि एकत्रित बसून जयंत पाटील निर्णय घेतील. जयंत पाटील यांनी पुन्हा जबाबदारी दिल्यास स्वीकारू.
- बी. के. पाटील,
विद्यमान तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी.
जयंत पाटील जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू. गेली २५ वर्षे पक्षाचे काम करत आहे. पदाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचे काम केले आहे. पद नसले तरीही एकनिष्ठेने काम करणारा मी कार्यकर्ता असून संधी दिल्यास राष्ट्रवादीला ताकद देऊ.
- बाळासाहेब पाटील,
सरचिटणीस, जिल्हा राष्ट्रवादी.