जिल्ह्यात पाच वर्षांत इथेनॉल उत्पादनात दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:12+5:302021-09-14T04:31:12+5:30
सांगली : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची दररोज तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता झाली असून, उसाचा रस, ...

जिल्ह्यात पाच वर्षांत इथेनॉल उत्पादनात दुप्पट वाढ
सांगली : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची दररोज तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता झाली असून, उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस आणि साध्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करीत आहेत. पाच वर्षांत कारखान्यांनी दुपटीने इथेनॉल उत्पादन वाढविले आहे. इथेनॉलकडे कल वाढल्यामुळे येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटणार आहे.
देशातील महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत करण्याचे केंद्र शासनाने उद्दिष्ट आहे. मागणी आणि साखरेच्या दराची घसरण लक्षात घेऊन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे.
राजारामबापू कारखान्याचे साखराळे युनिट प्रतिदिन ७५ हजार लिटर इथेनॉल तयार करत आहे. येत्या हंगामापासून ते दीड लाख लिटरवर जाईल. क्रांती कारखान्याचे ९० हजार लिटर, सोनहिरा कारखान्याचे ६० हजार लिटर इथेनॉलची उद्दिष्ट असून कंपन्यांच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. हुतात्मा, उदगिरी शुगर या कारखान्यांची प्रतिदिन ३० हजार लिटरची क्षमता असून तेही येत्या हंगामात पूर्ण क्षमतेने उत्पादन घेणार आहेत. राजेवाडी (ता. खानापूर) येथील श्री श्री रवीशंकर या कारखान्यानेही दररोज ५० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाचा निर्णय घेतला आहे.
चौकट
इथेनॉलला असा मिळतो दर
इथेनॉल प्रकार प्रतिलिटर दर
उसाच्या रसापासून ६२.६५ रुपये
बी हेवी मोलॅसिस ५७.६१ रुपये
साधे मोलॅसिस ४५.४९ रुपये
चौकट
रसापासूनच इथेनॉल
गेल्या वर्षी उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून ७७ टक्के इथेनॉल तयार केले आहे. येत्या हंगामामध्ये इथेनॉलसाठी उसाच्या रसाचा कारखानदार वापर करणार आहेत. रसापासूनच्या इथेनॉलला प्रतिलिटर ६२ रुपये ६५ पैसे दर मिळत आहे. पेट्रोलियम कंपन्याकडूनही त्याला जास्त मागणी आहे.
चौकट
साखरेला इथेनॉलचा उत्तम पर्याय : आर. डी. माहुली
साखरेचे दर आणि एफआरपीचा विचार करता कारखाने आर्थिक अडचणीत जाऊ शकतात. कारखानदारांनी उपप्रकल्प करण्याची गरज आहे. यामुळे चांगला दर देता येईल आणि कारखानेही व्यवस्थित चालू शकतील, असे मत राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केले.
चौकट
इथेनॉल करणारे कारखाने
कारखाना रोजची क्षमता लिटरमध्ये
राजारामबापू १५००००
क्रांती ९००००
सोनहिरा ६००००
हुतात्मा ३००००
उदगिरी ३००००
श्री श्री रवीशंकर ५००००