चिंचणी तलावाचा आपत्कालीन दरवाजा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:32+5:302021-06-18T04:18:32+5:30

फोटो ओळ : चिंचणी (अंबक) तालुका कडेगाव येथील तुडुंब भरलेल्या तलावाचा एक आपत्कालीन दरवाजा उघडताना विजय महाडिक, आनंदराव पाटील ...

The emergency door of Chinchani Lake was opened | चिंचणी तलावाचा आपत्कालीन दरवाजा उघडला

चिंचणी तलावाचा आपत्कालीन दरवाजा उघडला

फोटो ओळ : चिंचणी (अंबक) तालुका कडेगाव येथील तुडुंब भरलेल्या तलावाचा एक आपत्कालीन दरवाजा उघडताना विजय महाडिक, आनंदराव पाटील आदी.

कडेगाव :

चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील १५३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा सोनहिरा तलाव मान्सूनच्या आगमनापूर्वीच तुडुंब भरला होता. त्यात बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर तलावाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सोनहिरा खोऱ्यात संततधार पाऊस झाल्यामुळे तलावाच्या ३२ स्वयंचलित दरवाजांवर पाण्याचा दाब वाढला आहे. अचानक पूरस्थिती उद्भवू नये म्हणून या तलावाचा एक आपत्कालीन दरवाजा उघडला आहे.

चिंचणी तलावाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडल्यावर सोनहिरा खोऱ्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. या वर्षी तर तलाव तुडुंब भरल्याने धोका अधिक वाढला आहे. यावर उपाययोजना म्हणून पाटबंधारे विभागाच्या परवानगीने चिंचणी येथील देशभक्त श्यामराव मास्तर पाणीवापर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांच्या मदतीने चक्र फिरवून दोनपैकी एक आपत्कालीन दरवाजा उघडला आहे.

या तलावाचा दुसरा आपत्कालीन दरवाजा बंदच आहे. पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेल्या यांत्रिकी विभागाने या बंद दरवाजाची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच केलेली नाही. यामुळे आपत्कालीन स्थितीत फक्त एक दरवाजा उघडला जातो.

परंतु यावर आपत्कालीन स्थितीला तोंड देणे कठीण जाते.

दुसऱ्या दरवाजाची दुरुस्ती उन्हाळ्यातच करणे गरजेचे होते.

आता एका दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

त्यामुळे तलावाखाली येणाऱ्या गावातील सोनहिरा ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनानेही तलावाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

चौकट :

पूरस्थितीची भीती?

चिंचणी तलावाचे ३१ स्वयंचलित दरवाजे आहेत. पाण्याच्या दाबाने हे दरवाजे आपोआप उघडतात. फक्त तीन ते चार दरवाजे उघडले तरी सोनहिरा खोऱ्यात पूरस्थिती निर्माण होते. या पुरामुळे सोनहिरा ओढ्यावरील सर्व पूल आणि येरळा नदीवरील रामापूर व कामळापूर पूल पाण्याखाली जातात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुसरा आपत्कालीन दरवाजा तत्काळ दुरुस्त करून पाणी सोडून देणे गरजेचे आहे.

Web Title: The emergency door of Chinchani Lake was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.