एसटीच्या अधिकाऱ्यांकडून चालक, वाहकांचे खच्चीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:06+5:302021-09-21T04:30:06+5:30
सांगली : एसटी महामंडळात प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी वाहतुकीची नियमावली केली आहे. चालक, वाहकांच्या ज्येष्ठतेनुसार व त्यांच्या वयानुसार लांबपल्ल्याच्या ड्युट्या ...

एसटीच्या अधिकाऱ्यांकडून चालक, वाहकांचे खच्चीकरण
सांगली : एसटी महामंडळात प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी वाहतुकीची नियमावली केली आहे. चालक, वाहकांच्या ज्येष्ठतेनुसार व त्यांच्या वयानुसार लांबपल्ल्याच्या ड्युट्या दिल्या जात होत्या; पण काही अधिकाऱ्यांनी वाहतूक नियम बाजूला ठेवून चालक, वाहकांचे खच्चीकरण करण्यासाठीच ज्येष्ठांना लांबपल्ल्याच्या ड्युट्या लावल्या आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, एसटी महामंडळातील काही अधिकाऱ्यांनी सर्व नियम मोडून नवीन नियमावली कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता केली आहे. या परिपत्रकामुळे जे चालक व वाहक गेली पंचवीस ते तीस वर्षे ग्रामीण भागात लांबपल्ल्याची बस घेऊन जात होते. याच चालक, वाहकांना पुन्हा लांबपल्ल्याच्या ड्युट्या लावल्या आहेत. या चालक, वाहकांच्या वयोमानानुसार त्यांना दीर्घ आजार जडले आहेत. या चालक, वाहकांनाही लांबपल्ल्यावर पाठवण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे कामगार वर्गात असंतोष आहे. सक्तीने लांबपल्ल्यावर पाठवल्यामुळे त्यांचे मानसिक खचीकरण होत आहे. शारीरिक क्षमता व लांबपल्ल्याची बस घेऊन जाण्याचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून एखादा अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून ५० वर्षांवरील चालक, वाहकांना लांबपल्ल्याच्या मार्गावर पाठवू नये, अन्यथा एसटी कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही खोत यांनी दिला आहे.