वीजबिलांच्या थकबाकीचे ओझे २३९ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:46+5:302021-07-17T04:21:46+5:30
सांगली : वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ...

वीजबिलांच्या थकबाकीचे ओझे २३९ कोटींवर
सांगली : वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कृषी वगळता दोन लाख ९४ हजार ६१८ ग्राहकांकडे २३९ कोटी ९ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे वीज खरेदीसह देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविताना महावितरणची कसरत सुरू आहे. यामुळे महावितरणने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडितची कारवाई सुरू केली आहे.
जिल्ह्यामध्ये कृषी वगळता प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक दोन लाख ८७ हजार २३८ ग्राहकांकडे १०७ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या तीन हजार ८०६ वीजजोडण्यांची १२७ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनदेखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सर्व वरिष्ठ अधिकारीदेखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा सोयीचा व्हावा यासाठी शनिवारी, १७ व रविवारी १८ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकट
ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातून वीजबिल भरावे
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी थकीत वीजबिलासह चालूचे वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.