शिराळ्यात निवडणुकीवर बहिष्कारच
By Admin | Updated: October 26, 2016 00:13 IST2016-10-25T23:43:39+5:302016-10-26T00:13:41+5:30
एकही अर्ज विक्री, दाखल नाही : नगरपंचायतीसाठी मतदार मदत केंद्र सुरू

शिराळ्यात निवडणुकीवर बहिष्कारच
शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी शिराळकरांच्या निवडणुकीवरील बहिष्कारामुळे दुसऱ्या दिवशीही एकाही अर्जाची विक्री झाली नाही अथवा एकही अर्ज दाखल झाला नाही. मंगळवारी निवडणूक प्रशासनाने आॅनलाईन अर्ज भरण्यातील अडचणी दूर करण्यासाठी मतदार मदत केंद्र चालू केले आहे.
शिराळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व होते. तसेच अनेक इच्छुक, आपण पहिले नगरसेवक, नगराध्यक्ष व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र गावाचा नागपंचमीचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने सर्व पक्ष तसेच इच्छुकांनी, नागरिकांनी, पहिले काम जिवंत नागपूजा करण्यासाठी परवानगी, नंतर निवडणूक, असा पवित्रा घेतला. गावाचे नाव जगाच्या नकाशात ठळकपणे नागपंचमीच्या रूपाने व्हावे, यासाठी गावकऱ्यांनी नागपंचमी बचाव कृती समिती स्थापन केली. यामध्ये पहिल्यांदा जोपर्यंत जिवंत नागपूजेस परवानगी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचे नाही, असा पवित्रा घेतला.
सोमवार हा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे अनेकजण, काही होणार का? याकडे लक्ष देऊन होते. मात्र तहसील कार्यालयाकडे एकही इच्छुक नागरिक उमेदवार फिरकला नाही. त्यामुळे एकाही अर्जाची विक्री झाली नाही, त्यामुळे एकही अर्ज दाखल झाला नाही.
बचाव समितीचे सदस्य अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे शनिवार दि. २९ आॅक्टोबरपर्यंत याठिकाणी आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मंगळवारीही कोणीही इच्छुक या कार्यकर्त्यांकडे फिरकला नाही. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. भोसले, सहाय्यक निवडणूक अधिकारी ए. के. भोसले, संजय इंगवले, प्रकाश शिंदे, सुभाष इंगवले आदी तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते. (वार्ताहर)
गावकऱ्यांची भूमिका समितीकडून सादर
बचाव समितीमार्फत काळजी म्हणून या समितीचे रणजितसिंह नाईक, विश्वास कदम, गजानन सोनटक्के, देवेंद्र पाटील, के. वाय. मुल्ला, लालासाहेब शिंदे, पप्पू यादव, बसवेश्वर शेटे, संतोष गायकवाड, वैभव कुंभार, वसंत कांबळे, शंकरराव कदम, विनायक गायकवाड, अजय जाधव, वासीम मुल्ला, अशोकराव गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य याठिकाणी उपस्थित होते. कोणी अर्ज भरण्यास आलाच, तर त्यास गावकऱ्यांची भूमिका सांगण्यासाठी हे सदस्य उपस्थित होते.