स्पर्धा परीक्षेत यशासाठी आठ वर्षांचा संघर्ष, तीनवेळा दांडी उडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:01+5:302021-07-07T04:32:01+5:30

आयकर विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्त झालेल्या बेडग येथील श्रीधर लिंबीकाई याचा सत्कार प्रा. रवींद्र फडके, तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबीकाई ...

Eight years of struggle for success in competitive exams, three times in a row | स्पर्धा परीक्षेत यशासाठी आठ वर्षांचा संघर्ष, तीनवेळा दांडी उडाली

स्पर्धा परीक्षेत यशासाठी आठ वर्षांचा संघर्ष, तीनवेळा दांडी उडाली

आयकर विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्त झालेल्या बेडग येथील श्रीधर लिंबीकाई याचा सत्कार प्रा. रवींद्र फडके, तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबीकाई यांच्या हस्ते झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : बेडग (ता. मिरज ) येथील डॉ. श्रीधर रावसाहेब लिंबिकाई याची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धापरीक्षेत तब्बल तीनवेळा दांडी उडाली. एकदा तर अवघ्या तीन गुणांनी यशाने हुलकावणी दिली. पण त्याने पाठपुरावा सोडला नाही. अखेर यशाचा एव्हरेस्ट सर केलाच. नुकतीच त्याची आयकर विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली.

स्पर्धा परीक्षेत यशानंतरही नियुक्तीअभावी पुण्यात स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, त्या पार्श्वभूमीवर श्रीधरचा संघर्ष स्पर्धा परीक्षेच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा. बेडगच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणानंतर नागपूरमधील महाविद्यालयातून तो दातांचा डॉक्टर झाला. वडील जीवन प्राधीकरणमध्ये पंप ऑपरेटर होते. श्रीधरने डॉक्टर व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. श्रीधरला मात्र क्लासवन अधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी खुणावत होती. डॉक्टर होऊन वडिलांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्याने स्वत:च्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरु केला.

२०१४ पासून स्पर्धा परीक्षेच्या मार्गावर वाटचाल सुरु केली. पहिल्याच दणक्यात पूर्वपरीक्षेत दांडी उडाली. पण पुढीलवर्षी मात्र उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षेत मात्र पुन्हा अपयशाने वाकुल्या दाखविल्या. २०१६ हे वर्षदेखील अपयशाचेच ठरले. पण ते यशाची पायाभरणी ठरले. परीक्षेच्या खाचाखोचा, गमक समजले. २०१७ मध्ये पुन्हा जोर लावला. घवघवीत यश मिळवले. मुलाखतही छान झाली, पण गुणांची गोळाबेरीज तीनने कमी पडली. अधिकारीपदाच्या खुर्चीने हुकलावणी दिली.

२०१८ साली पुन्हा प्रयत्न केला, पूर्वपरीक्षेत यश मिळवले, मुख्य परीक्षा मात्र निराशा करणारी ठरली. २०१९ मध्ये सहावी म्हणजे शेवटची संधी होती. यावेळी पूर्ण झोकून देऊन अभ्यास केला. रात्रं-दिवस ध्यास घेतला आणि यशाचे एव्हरेस्ट सर झाले. १ जुलै रोजी आयकर विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली. आयकर विभागातील नियुक्तीबद्दल प्रा. रवींद्र फडके, तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबिकाई, धनचंद्र साळे, जीवनधर लिंबिकाई आदींच्या उपस्थितीत श्रीधरचा सत्कार झाला.

चौकट

डॉक्टरकी थोडक्यात टळली...

श्रीधर सांगतात, २०१३ पासूनचा आठ वर्षांचा कालखंड मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारा होता. वडील चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले, तरीही शैक्षणिक कर्जाची जबाबदारी त्यांनी पेलली. अधिकारी होता येत नसेल तर परत येऊन वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू करावी असा त्यांचा आग्रह होता,. पण माझा निग्रह कायम होता. त्याच्या आधारेच यशाचे शिखर गाठले.

Web Title: Eight years of struggle for success in competitive exams, three times in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.