चाकूचा धाक दाखवून आठ तोळे दागिने लंपास
By Admin | Updated: September 23, 2014 00:46 IST2014-09-23T00:42:30+5:302014-09-23T00:46:47+5:30
विट्यातील घटना : महिला जखमी; भरदिवसा चोरीने खळबळ

चाकूचा धाक दाखवून आठ तोळे दागिने लंपास
विटा : पोलीस असल्याचे सांगून दागिने मागणाऱ्या दोघा चोरट्यांना विरोध करणाऱ्या महिलेस चाकूचा धाक दाखवून आठ तोळ्यांचे सुमारे दोन लाख १६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रत्नमाला आबासाहेब कुंभार (वय ६२, रा. कऱ्हाड रस्ता, विटा) असे महिलेचे नाव असून, यावेळी त्यांच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटल्याने त्या जखमी झाल्या. ही घटना आज, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला रत्नमाला कुंभार (मूळ गाव वेजेगाव, ता. खानापूर) कुटुंबीयांसमवेत राहतात. आज आठवडा बाजार असल्याने त्या पावणेबाराला भाजीपाला घेऊन घराकडे जात असताना आरोग्य केंद्राच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर दोघे अनोळखी त्यांच्याजवळ गेले. त्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगून, परिसरात भरपूर चोऱ्या होतात, चोर चाकू मारतात, त्यामुळे तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व पाटल्या आमच्याकडे द्या, आम्ही येथेच राहतो, तुम्हाला लगेच परत देतो, अशी बतावणी केली. मात्र, कुंभार यांनी आपणही याच ठिकाणी राहत असल्याचे सांगत सोन्याच्या बांगड्या व पाटल्या देण्यास विरोध केला. त्यावेळी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या हिसकावून घेऊन पळ काढला. यावेळी काचेच्या बांगड्या फुटून कुंभार यांच्या हाताला दुखापत झाली. कुंभार यांनी आरडाओरडा केला, परंतु लोक जमा होण्यापूर्वीच चोरटे रस्त्याच्या बाजूला लावलेल्या दुचाकीवरून बसस्थानकच्या दिशेने पसार झाले. (वार्ताहर)
पोलीस असल्याचे भासवून धमकावले
चोरट्यांनी पोलीस असल्याचे सांगून दागिन्यांची मागणी केली, परंतु त्याला विरोध केल्याने संशयितांनी चाकूचा धाक दाखवत दागिने हिसकावून घेऊन पळ काढला, अशी माहिती कुंभार यांनी घटनास्थळावर आलेल्या लोकांना दिली.
मात्र, पोलिसांनी घेतलेल्या फिर्यादीत चोरट्यांना कुंभार यांनी दागिने काढून दिल्यानंतर चोरटे पसार झाल्याची नोंद केल्याने नक्की काय प्रकार घडला, याबाबत नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.