आठ हजार एकरातील पिके धोक्यात
By Admin | Updated: January 29, 2015 00:11 IST2015-01-28T22:58:36+5:302015-01-29T00:11:01+5:30
राजेवाडी तलावात अपुरा पाणीसाठा : सिंचन सुविधांची वानवा; पिके करपण्याची भीती

आठ हजार एकरातील पिके धोक्यात
लक्ष्मण खटके - लिंगीवरे -राजेवाडी तलावात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे त्यावर आधारित असणाऱ्या सुमारे आठ हजार एकर पिकाला धोका निर्माण झाला असून, पाण्याच्या ऐन गरजेच्या हंगामात पिके पाण्यावाचून करपण्याची भीती निर्माण झाली आहे. -राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर आधारित ४४२०८ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ पूर्वी मिळत होता. तलावाच्या डाव्या कालव्याद्वारे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पुजारवाडी, दिघंची, सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, महूद, अचकदाणी, लक्ष्मीनगर आणि पूर्वेकडील काही भाग असे सिंचनाचे लाभक्षेत्र आहे. याशिवाय माण तालुक्यातील पळसवडे, देवापूर, हिंगणी, ढोकमोड या गावांनाही तलावातील पाण्याचा थेट लाभ मिळतो. तलावात पाणीसाठा असतानाच या क्षेत्राला त्याचा लाभ होतो. तलावाच्या डाव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यात येते. पण पावसाच्या कमतरतेमुळे सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणी पातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न उभा आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता, तलावातील पाणीसाठा तुटपुंजा वाटत आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न जनतेच्या काळजातच फक्त जळताना दिसत आहे. तलावात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा नसल्यामुळे आता डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी संपूर्ण पिके हाता-तोंडाला येत असतानाच पाण्यावाचून करपण्याची चिन्हे व भीती निर्माण झाली आहे. पोटऱ्यातील ज्वारी पीक भरणीतील मका, गहू, हरभरा, ऊस उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतंत्र सिंचन योजनेद्वारे विहिरी, कूपनलिका, आड यामार्फत पाणीपुरवठा करून पिके भिजविण्याची तयारी न केल्यास या पिकांची राख होण्यास वेळ लागणार नाही.
गाळ साठल्याने पाणीसाठा कमी
तलावात गेल्या शतकापासून गाळ मोठ्या प्रमाणात साचू लागल्यामुळे व त्याचा पुरेसा उपसा न झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा १४९३ दशलक्ष घनफूटपेक्षाही कमी झाला. त्यामुळे तलावाचे सिंचन लाभक्षेत्र ४४२०८ एकरावरुन केवळ ८ ते १० हजार एकरापर्यंत कमी झाले आहे. सध्या तलावात पाणीसाठा खूप कमी आहे. पाणीपातळी पाच दारांच्या जवळपास आली आहे. राखीव पाणीसाठ्याचा प्रश्न निंर्माण झाला आहे. शिवाय माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत मागणी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करता तलावातील पाणीसाठा तुटपुंजा आहे. राजेवाडी तलाव पाण्याने भरून घेण्याबाबत राजकीय उदासीनता असतानाच, प्रशासनालाही या प्रश्नाचे सोयरसुतक नाही.
तलावाच्या पाण्याच्या भरंवशावर केलेली पिके आता कधी करपतील सांगता येत नाही. शासनाने तलाव भरून घेण्यासाठी व माणगंगा नदीत पाणी सोडून बारमाही करण्यासाठी प्रयत्न केले, तरच शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करता येईल.
- चंद्रकांत मदने, शेतकरी, राजेवाडी