जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:17+5:302021-04-25T04:27:17+5:30
सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग पाहिला तर येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड संपतील, अशी स्थिती आहे. प्रशासनाने आता ...

जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती प्लांटसाठी प्रयत्न
सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग पाहिला तर येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड संपतील, अशी स्थिती आहे. प्रशासनाने आता तालुका पातळीवरही उपचारांची सोय केल्याने रूग्णसंख्या वाढली तरी उपचारासाठी यंत्रणा सज्ज आहे. ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी जिल्ह्यातच निर्मिती प्लांट सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार अरूण लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने सध्या दहा हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यात दररोज हजार रूग्णांची भर पडत असल्याने यंत्रणेवरील ताण वाढत आहे. रूग्णवाढीचा वेग बघता, येत्या चार-पाच दिवसात जिल्ह्यातील सर्व बेड्स फुल्ल होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तालुका पातळीवर उपचारांची सोय केली आहे. कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. यासाठीच आता प्रशासनाने जिल्ह्यातच ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. महापालिका, जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांनी उपचाराची सोय करण्यावर भर द्यावा.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामीण भागातील जबाबदार घटकांना सोबत घेऊन प्रशासनाने काम करावे. गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर पडणार नाहीत, यासाठीही अजून कठोर नियमावली करावी, जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. लसीकरणाचे नियोजन केल्यास कोणतीही अडचण येणार नाही.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आदी उपस्थित होते.
चौकट
रेमडेसिविरचा पुरवठा केंद्राच्या हातात
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविरची मागणी वाढत असली तरी आता त्याचा पुरवठा केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या इंजेक्शनमधील काही वाटा जिल्ह्याला मिळणार आहे. तरीही अधिक कुप्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे.