लोकमत इफेक्ट : धान्य वाटपातील कमिशनच्या अफरातफरीची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 12:06 PM2021-11-17T12:06:39+5:302021-11-17T12:08:17+5:30

‘लोकमत’मधून हा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कमिशन वाटपातील अनियमिततेची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी चौधरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Effect of Lokmat There will be an inquiry into the fraud of the grain distribution commission in sangli | लोकमत इफेक्ट : धान्य वाटपातील कमिशनच्या अफरातफरीची चौकशी होणार

लोकमत इफेक्ट : धान्य वाटपातील कमिशनच्या अफरातफरीची चौकशी होणार

googlenewsNext

दत्ता पाटील
तासगाव : शासनाकडून आलेल्या मोफत धान्याचे वाटप केल्यानंतर मिळालेले कमिशन संस्थांऐवजी थेट सेल्समनच्या नावावर वर्ग करून संस्थेच्या उत्पन्नावरच डल्ला मारण्याचा कारनामा प्रशासन आणि सेल्समनच्या संगनमताने झाला. याबाबतचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाईचा इशाराही दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात राज्य शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात धान्य वाटप केल्याचा मोबदला म्हणून दीड रुपया प्रतिकिलोनुसार जिल्ह्यात दहा कोटी ५४ लाख ८ हजार ४७५ रुपयांचे कमिशन तीन टप्प्यात देण्यात आले होते. मात्र, ते वितरित करतानाच तहसीलस्तरावर प्रशासन आणि सेल्समन यांच्या संगनमताने डल्ला मारण्याचा ‘फॉर्म्युला’ तयार झाला. त्यानुसार संस्था आणि सचिवांना अंधारात ठेवून संस्थेऐवजी सेल्समनच्या खात्यांचे रेकॉर्ड जोडून त्यांच्या खात्यावर कमिशन वर्ग करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून सेल्समननी संस्थेला अंधारात ठेवून पंचवीस टक्क्यांचे ‘डील’ करून अफरातफर केली. अपवादवगळता अनेक ठिकाणी असे प्रकार झाले आहेत. तासगाव तालुक्यात बहुतांश ठिकाणी असे प्रकार झाल्याचे चव्हाट्यावर आले आहे. अन्य तालुक्यांतही काही ठिकाणी सेल्समनच्या खात्यावर रकमा वर्ग केल्या गेल्या.

‘लोकमत’मधून हा घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कमिशन वाटपातील अनियमिततेची जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कमिशन वाटपाची सखोल चौकशी करून याबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडून कमिशन वाटपाचा अहवाल मागवला आहे. कमिशन वाटप आणि वर्ग झालेल्या खात्यांच्या रेकॉर्डची पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिला आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करणार : जिल्हा उपनिबंधक

संस्थेकडून धान्य वाटपाचा व्यवसाय केला जातो. सेल्समन संस्थेत नोकरी करतो. त्यामुळे कमिशन संस्थेच्याच नावावर वर्ग होणे अपेक्षित आहे. या अनियमिततेबाबत स्वतंत्र लेखा परीक्षकांमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. यात दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिला आहे.

Web Title: Effect of Lokmat There will be an inquiry into the fraud of the grain distribution commission in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.