गोकुळचे अर्थकारण २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:22+5:302021-05-09T04:27:22+5:30

मात्र, गोकुळ संघ टिकला पाहिजे. कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका ताराराणी, राजर्षी शाहू छत्रपती, कोल्हापूरची कुस्ती, कोल्हापूरची चित्रनगरी, कोल्हापूरचा पन्हाळा, रंकाळा, ...

Economics of Gokul 2 | गोकुळचे अर्थकारण २

गोकुळचे अर्थकारण २

मात्र, गोकुळ संघ टिकला पाहिजे. कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका ताराराणी, राजर्षी शाहू छत्रपती, कोल्हापूरची कुस्ती, कोल्हापूरची चित्रनगरी, कोल्हापूरचा पन्हाळा, रंकाळा, कोल्हापूरचा गूळ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ तसेच या मातीचा सुगंध दरवळत ठेवणारा ब्रँड म्हणजे गोकुळ आहे. हजारो-लाखो बायाबापड्यांनी पहाटे पहाटे शेणात हात घालून म्हशी, गायींची निगा केली म्हणून हा दूध संघ उभा राहिला आहे. गुजरातची एक महत्त्वाची ओळख म्हणजे अमूल हा दूध संघांचा महासंघ आहे. तसा गोकुळ हा कोल्हापूरच्या छोट्या-छोट्या शेतकऱ्यांचा दूध संघ आहे. संघावर निवडून येणाऱ्यांनी धारा कधी काढल्यात, त्यांच्या बायकांनी कधी शेणात हात घातला असेल की नाही, माहीत नाही; पण भुदरगडच्या कोपऱ्यातील छोट्या गावांपासून पन्हाळ्याच्या पायथ्यापर्यंतच्या गावांपर्यंतच्या शेतकरी बायकांनी या संघात आपल्या कष्टाचे बळ दिले आहे. आनंदराव पाटील-चुयेकर आणि अरुण नरके या दोघांनी त्याला आकार दिला. महाराष्ट्रातील ग्रामीण चौतीस जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यात दूध संघ इतका यशस्वी झालेला नाही. शेजारच्या साताऱ्यात जिल्हा संघच नाही आणि सांगलीत सहकारमहर्षी वसंतदादांच्या नावे आहे; पण तो कधी धड चालू दिलाच नाही. पुणे, नगर, नाशिक, जळगाव या उत्तम शेतीपट्ट्यात देखील जिल्हा दूध संघ भक्कम नाहीत. अकरा जिल्ह्यांच्या संपूर्ण विदर्भात जेवढे दूध गोळा होते, तेवढे एकटा गोकुळ दूध संघ दररोज संकलन करतो आहे. हा ब्रँड या राजकारणात कोमेजून जाता कामा नये. तो मल्टीस्टेट करण्याचा वाद चालू होता. मला वाटते मल्टीस्टेटच नव्हे, एकदा मल्टीनॅशनल कंपनीसारखा ब्रँड झाला पाहिजे. मल्टीस्टेट झाला तर उत्तर कर्नाटकातील दूध संकलन उघडपणे करता येईल. गोवा आणि कर्नाटकात दुधाची विक्री करता येईल. सध्या गोव्यात विक्री केली जातेय. अरुण नरके यांनी अमूलचे प्रमुख स्व. डॉ. व्ही. कुरियन यांना आदर्श मानून काम केले होते. तसे संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी गोकुळने प्रयत्न करायला हवा.

संघातील मलिद्याची चर्चा नेहमी खासगीत होते. ती बंद करा ना! आपल्या आया-बाहिणींच्या कष्टातून गोकुळचे वैभव उभे राहिले आहे. त्याच्या कष्टावरून आलेली मलई कशी खाता? ते बंद होणार नसेल आणि पुढील पाच वर्षांत स्वत:चे भांडवल एक हजार कोटी रुपये गोकुळ करणार नसेल तर या राजकीय सत्तांतरास काही अर्थ नाही. केवळ संचालक मंडळींची बोर्डावरील नावे बदलली, असे म्हणता येईल. वारणा दूध आजही मल्टीनॅशनल कंपनीसाठी बोर्नव्हिटा तयार करीत असेल, याचाच अर्थ मल्टीनॅशनल कंपनी होण्याची गुणवत्ता आणि उत्पादकता वारणा दूध संघात असेल, तसेच गोकुळने आपले सर्व ब्रँडस्‌ बाजारात घेऊन उतरावे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात अमूल दिसत आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या शेतकऱ्यांच्या कष्टावर उभा राहिलेला हा ब्रँड देशव्यापी होऊ द्यावा!

Web Title: Economics of Gokul 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.