विट्यात अपहरण करून एकास बेदम मारहाण
By Admin | Updated: February 7, 2015 00:11 IST2015-02-06T23:22:32+5:302015-02-07T00:11:23+5:30
परस्परविरोधी फिर्याद दाखल : शिवाजी चौकात रास्ता रोकोचा प्रयत्न; किरकोळ वादाने तणाव

विट्यात अपहरण करून एकास बेदम मारहाण
विटा : मोटार व्यवस्थित चालव, असा सल्ला दिल्यावरून चौघांनी रामचंद्र धोंडिराम साबळे (वय ४६, रा. आंबेडकरनगर, विटा) यांना जातीवाचक शिवीगाळ करीत अपहरण करून बेदम मारहाण केल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी ८.१५ वाजता येथे घडली. या घटनेनंतर आंबेडकरनगर, फुलेनगर, मायाक्कानगर, नेहरूनगर येथील तरुणांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सागर भानुदास चोथे, राहुल चंद्रकांत जाधव, संदीप दाते व अभिजित चंद्रकांत आदाटे (सर्व रा. विटा) या चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेनंतर दुपारी साडेबारा वाजता संशयित सागर चोथे याचे लेंगरे रस्त्यावरील लकीसागर टाईल्सचे दुकान व दुचाकी फोडून सुमारे १ लाख ६० हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी रामचंद्र साबळे यांचा मुलगा मयूर रामचंद्र साबळे याच्यासह अनोळखी तिघांविरुध्दही सागर चोथे याचा भाऊ महेश चोथे यांनी फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.येथील रामचंद्र साबळे नगरपरिषदेत सफाई कर्मचारी आहेत. दि. ५ रोजी सायंकाळी ते घरी निघाले असता, सागर चोथेने मोटार आडवी मारल्याने साबळे यांनी त्याला ‘गाडी व्यवस्थित चालव’, असे सांगितल्यानंतर वादावादी झाली. आज, शुक्रवारी, दि. ६ रोजी साबळे दुचाकीवरून कामाला जात असताना मायणी रस्त्यावर सागर चोथे, राहुल जाधव, संदीप दाते व अभिजित आदाटे चारचाकीतून (क्र. एमएच १० बीएम ३७३७) आले. चौघांनी साबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यांना चारचाकी गाडीतून जबरदस्तीने पळवून नेले. गार्डीमार्गे घानवड येथील टेक्स्टाईल पार्कजवळ साबळे यांना पुन्हा मारहाण करून साळशिंगेत नेले. साबळे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दूरध्वनीवरून या चौघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न साधून साबळे यांना घेऊन येण्याबाबत सूचना केली, परंतु ते आले नसल्याने साळशिंगे येथे धाव घेऊन सागर चोथे यास ताब्यात घेतले. साबळे यांची मुलगी मधुरा साबळे यांनी चौघांविरुध्द जातीवाचक शिवीगाळ, बेदम मारहाण व अपहरण केल्याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चोथे यास अटक केली. परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
टाईल्सच्या दुकानाची मोडतोड
या घटनेनंतर दुपारी साडेबारा वाजता साबळे यांचा मुलगा मयूर याने तीन मित्रांना सोबत घेऊन लेंगरे रस्त्यावरील चोथे याच्या लकीसागर टाईल्सच्या दुकानात येऊन साहित्य व दुचाकीची (क्र. एमएच १० बीसी ९८८) मोडतोड करून महेश चोथे, आई कल्पना यांना मारहाण करून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद महेश चोथे यांनी दिली.