मिरजेतील दोन बालिकांची थॅलेसमियामुळे परवड

By Admin | Updated: December 25, 2014 00:04 IST2014-12-24T23:36:22+5:302014-12-25T00:04:52+5:30

जगण्यासाठी संघर्ष : रक्तपुरवठा करण्यास शहरातील रक्तपेढ्यांची टाळाटाळ; आई-वडिलांची धावाधाव --लोकमत विशेष

Due to the thales system of cholesterol, | मिरजेतील दोन बालिकांची थॅलेसमियामुळे परवड

मिरजेतील दोन बालिकांची थॅलेसमियामुळे परवड

सदानंद औंधे - मिरज -थॅलेसमियाच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचे बंधन असतानाही रक्तपेढ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने मिरजेतील दोन बालिकांची परवड सुरू आहे. वैष्णवी (वय ३) व अनुष्का (वय १) या दोन गरीब कुटुंबातील बालिकांना नियमित उपचार मिळवून जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
थॅलेसमिया या जन्मजात विकाराने रुग्णांच्या रक्तातील पेशी, हिमोग्लोबीन कमी होत असल्याने अशा रुग्णांना ठराविक दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त न दिल्यास थॅलेसमियाच्या रुग्णांचा जीव धोक्यात येतो. थॅलेसमियाच्या रुग्णांना नियमित रक्त मिळावे, यासाठी रक्तपेढ्यांना अशा रुग्णांना मोफत व तातडीने रक्त देण्याचे बंधन आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून रक्तपेढ्यांना परवाना देतानाच थॅलेसमियाच्या रुग्णांना रक्तपुरवठ्याची अट आहे. मात्र रक्तपेढीचालक थॅलेसमियाच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठ्यासाठी रक्तदाते आणण्याची अट घालत असल्याने गरीब रुग्णांची परवड होत आहे. मिरजेत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या नरेश सचदेव या तिशीतील तरुणाच्या वैष्णवी व अनुष्का या दोन मुलींना थॅलेसमियाचा विकार आहे. तुटपुंजे उत्पन्न असलेल्या नरेशचा याही परिस्थितीत मुलींना जगविण्याचा निर्धार आहे. प्रत्येक मुलींना प्रत्येक तीन आठवड्यानंतर रक्त देण्यासाठी व औषधासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च आहे. सचदेव दाम्पत्य पोटाला चिमटा काढून मुलींसाठी वैद्यकीय खर्च करीत आहे. मात्र त्यांच्या धडपडीला रक्तपेढी चालकांकडून सहकार्य मिळत नसल्याने दुर्दैवी वैष्णवी व अनुष्का यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. ज्या रुग्णालयात उपचार करण्यात येतात, त्या रुग्णालयाच्या रक्तपेढीची रक्त पुरवठ्याची जबाबदारी असतानाही रक्तदाते आणण्याची किवा बाहेरून रक्त आणण्याची सक्ती करण्यात येते. अनेकवेळा रक्तदाते वेळेवर न मिळाल्याने वैष्णवी व अनुष्का या भगिनींना रक्तदात्यांच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. काही रुग्णालयात ठराविक रक्तपेढ्यांतूनच रक्त आणण्याची मागणी होते. रक्त वेळेवर मिळाले नाही, तर वैष्णवी व अनुष्का यांना धाप लागणे, चक्कर येणे, थकवा येणे असा त्रास सुरू होतो. गोंडस व निरागस मुलींचे हाल बघवत नसल्याने त्यांच्या माता-पित्याची गेली तीन वर्षे धावपळ सुरू आहे. थॅलेसमियामुळे यापुढील आयुष्यातही खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याची सचदेव दाम्पत्याला जाणीव आहे.

आर्थिक मदतीची गरज
थॅलेसमिया या आजारासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एकच उपचार आहे. मात्र त्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. दोन्ही मुलींसाठी ६० लाखांचा शस्त्रक्रियेचा पर्याय पेलविणारा नाही. मुलींना जगविण्यासाठी प्रत्येक २१ दिवसांनी रक्त देण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीला नातेवाईकांची, समाजाची किंवा शासनाची मदत नसल्याने सचदेव दाम्पत्य हतबल आहे. समाजात मुलींची हेळसांड करण्याची प्रवृत्ती असताना सचदेव दाम्पत्याचा मुलींच्या दुर्धर आजाराविरुध्द लढा कौतुकास्पद आहे. तारुण्यात हौस, मौज करण्याऐवजी मुलींना जगविण्यासाठी सचदेव दाम्पत्याने सर्वस्व पणाला लावले आहे.

Web Title: Due to the thales system of cholesterol,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.