जूनच्या पहिल्या आठवड्यातील जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण आता पाऊस लांबल्याने पिके माना टाकू लागली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागून राहिल्या आहेत.
जूनच्या सुरुवातीलाच धुमाकूळ घातलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. हवामान विभागानेही यंदा १०२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवल्याने पेरण्यांची लगबग झाली. सोयाबीन, उडीद, मका, मूग आदींच्या पेरण्यांनी गती घेतली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पेरण्या केलेले शेतकरी चिंतेत आहेत, तर पेरण्या न झालेले शेतकरी ढगांकडे डोळे लावून आहेत.
दहा मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. तरीही दमदार पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण आता पावसाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.
कसदार शेतांमध्ये तसेच काळ्या मातीच्या जमिनींमध्ये अद्याप भरपूर ओलावा आहे. पहिल्या पावसाने ही शेते तुडुंब झाली होती. तेथील पिके अजूनही तग धरून आहेत. आणखी १५ दिवस पावसाविना जिवंत राहू शकतात. माळरानाच्या शेतात मात्र जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्हांमुळे इवलीशी रोपे माना टाकू लागली आहेत. ठिबक किंवा स्प्रिंकलरच्या मदतीने त्यांना जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
चौकट
जुलैचा पहिला आठवडा कोरडाच
हवामानविषयक संकेतस्थळांच्या अंदाजानुसार मंगळवारी (दि. २९) दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जुलैचा संपूर्ण पहिला आठवडा कोरडाच राहण्याची भीती आहे. ८ जुलैच्या सुमारास पाऊस परतेल असे संकेतस्थळांचे अंदाज आहेत.