अवकाळी पावसामुळे ज्वारी महागण्याची शक्यता

By Admin | Updated: April 3, 2015 00:37 IST2015-04-02T23:42:15+5:302015-04-03T00:37:20+5:30

जत तालुक्यातील चित्र : कडबा मोठ्याप्रमाणात काळा पडल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार

Due to the incessant rains, the possibility of costlier jowar | अवकाळी पावसामुळे ज्वारी महागण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे ज्वारी महागण्याची शक्यता

गजानन पाटील - संख -जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे. कडबा भिजल्यामुळे तोही काळा पडला आहे. तो जास्त दिवस टिकून राहणार नसल्याने कुजका वास येत असल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनातही घट होणार आहे. उतारा कमी निघाल्यामुळे बाजारात ज्वारीच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कडबा कमी निघाल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार असून दरात वाढ होणार आहे.
अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी व ढगाळ हवामानामुळे गव्हाला लोंब्या कमी सुटल्या असून तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारी व गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे.रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी लाभल्यामुळे पेरणी वेळेवर झाली. अनुकूल हवामानामुळे रब्बीची पेरणी चांगली झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु ऐन काढणीवेळी मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. टपोरे दाणे काळे पडल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. वैरणही काळी पडली आहे. यावर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.बहुतेक ठिकाणी सध्या ज्वारी पिकाची काढणी, कणसे तोडणी-मळणी चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतातील खळ्यावर ज्वारीची कणसे बडवून मळणी करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. सध्या सर्वत्र शेतकरी वर्ग ज्वारीच्या कणसांची मळणी यंत्रावर करताना दिसत आहे. यंत्रावर मळणीचा दर पोत्याला १०० ते १२० रुपये असा आहे. काही ठिकाणी पोत्याला ४ ते ५ शेर ज्वारी घेतली जाते. यंत्रावर १० ते १२ पोती सहज निघतात, अशी माहिती मळणी यंत्र चालक बिराप्पा करपे यांनी दिली. मळणी यंत्रे बहुतेक रॉकेल किंवा डिझेलवर चालतात.
ज्वारीचा कडबा एकरी २००० ते २५०० पेंड्या निघत आहेत. शेतकरी आपल्या शेतातील कडबा न विकता जनावरांसाठी कडब्याच्या मोठ्या गंजी लावून ठेवत आहेत. पण झालेल्या अवकाळी पावसामुळे वैरण रानात भिजली आहे. शेतात असलेले ज्वारी पीकही भिजल्याने कडबा काळा पडला आहे. त्याचा कुजका कुबट वास येत आहे. त्यामुळे वैरणीची गंजी जास्त काळ टिकणार नाही. जनावरे थोड्या दिवसांनी ही वैरण खाणार नाहीत. वैरणीच्या दरात वाढ होणार आहे. सध्या ६ रुपये २५ पैसे पेंडीस, इतका दर आहे. तालुक्यामध्ये २ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर गहू पिके घेतले जाते. यावर्षी परतीच्या समाधानकारक पावसामुळे गहू क्षेत्रात वाढ झाली आहे. कमी थंडी सुटल्यामुळे गव्हाला लोंब्या कमी उरलेल्या असून टपोरे दाणे भरलेले नाहीत. ढगाळ हवामानामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने गहूही भिजला आहे. लोंब्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
मजुराची टंचाई जाणवत आहे. मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. ९ ते २ वाजेपर्यंत पुरूषाला २०० रुपये, तर महिलेस १५० रुपये, मजुरी द्यावी लागत आहे. गावात दुपारच्यावेळी माणसांची वर्दळ कमी झाली आहे.

Web Title: Due to the incessant rains, the possibility of costlier jowar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.