दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:25 AM2019-01-20T01:25:25+5:302019-01-20T01:25:41+5:30

अविनाश बाड । आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र ...

  Due to drought, the new way of income in Atpadi taluka | दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

Next
ठळक मुद्देशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा; दहा रुपयाला मिळते घागरभर पाणी

अविनाश बाड ।
आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र भलताच तेजीत आला आहे. शासकीय पाण्याचे टँकर अंतर वाचवून पैसे मिळविण्यासाठी कुठूनही, कसलेही पाणी आणत आहेत. याचा फायदा शुद्ध पाणी विकणाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर शासन लाखो रुपये खर्च करत असताना नागरिकांना १० रुपयाला एक घागर या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

आटपाडी तालुक्यात यंदा पावसाच्या अभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी तालुक्यात आंबेवाडीला पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु झाला. सध्या तालुक्यात ७ गावात आणि १२७ वाड्या-वस्त्यांवर ११ टँकरच्या ३५ खेपांनी कागदोपत्री पाणी पुरवठा सुरु आहे. आधीच माणसी २० लिटरप्रमाणे पाणी मंजूर केले जाते. त्यात कधीच पूर्ण खेपा केल्या जात नाहीत. त्यामुळे जेव्हा टँकरचे पाणी मिळेल तेव्हा पाणी टंचाईने त्रासलेले नागरिक मिळेल तसले पाणी निमूटपणे घेतात. पण खारट, गढूळ साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी पिल्याने लोकांना पोटाचे आजार होऊ लागले आहेत. यावर डॉक्टरांकडून पिण्यायोग्य पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या तालुक्यातील २३ हजार ९०८ एवढी लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. नागरिकांना नाईलाजाने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यात बहुतेक सर्व गावात घरोघरी लोक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. ५ रुपयाला २० लिटरपासून ते ४० रुपयांना २० लिटर या दराने पाणी विकणारे अनेक प्रकल्प तालुक्यात आहेत.

आटपाडीत फोन केला की घरपोच पाणी पुरवठा केला जातो. तर गावोगावी दररोज फिरुन शुद्ध पिण्याचे पाणी विकले जात आहे. आता शुद्ध असल्याचा दावा करुन विकले जाणारे हे पाणीसुद्धा खरेच आरोग्यास किती हितकारक आहे, हा चौकशीचा भाग आहे. लाखो रुपये खर्चून शासनाचे टँकर वेळेत येत नाहीत; मात्र खासगी विकतचे पाणी दररोज वेळेत उपलब्ध होत आहे.
शासकीय पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी निंबवडे येथील हिराबाई देवडकर यांची विहीर, आटपाडी ग्रामपंचायतीची तलावाखालील विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, आटपाडी, राजेवाडी येथील सुरेश कोडलकर आणि झरे येथे भगवान पाटील यांची विहीर अधिग्रहण केलेली आहे. टँकरसाठी याच विहिरीतून पाणी भरणे बंधनकारक आहे. टँकरचालकांनी खेपा अंतर चूकवू नये, यासाठी सध्या जीपीएस प्रणालीचा वापर केला जात आहे. तरीही टँकरवाले खेपात आणि पाण्यात गोलमाल करुन लोकांचे हाल करीत आहेत. विहिरीतील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यायोग्य कसे येत नाही, यावर कुणीच गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

अनेक टँकर शासकीय पाणी पुरवठा असे लिहिणे बंधनकारक असताना तसा फलक लावण्यात आलेला नाही. टँकरच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. टँकरद्वारे पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी शुद्ध अथवा निर्जुंतक असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात नसल्याचे वास्तव आहे. टँकरद्वारे मंजूर असलेल्या पूर्ण खेपा दररोज विनाखंड टाकल्या जात नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टँकरचालक : मालामाल
वारंवार येणाºया दुष्काळाने तालुकावासीयांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हाल सहन करावे लागतात. टँकरच्या मंजुरीपासून बिले अदा करण्यापर्यंतच्या प्रवासात सरकारी बाबंूना टक्केवारी मिळते. सध्या १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरला दिवसाला १११० रुपये अधिक १२ रुपये किमी दराने भाडे मिळते. अंतर आणि खेपा वाचवून टँकरवाले मालामाल होतात, तर ग्रामपंचायतीकडून खेपा झाल्याच्या नोंदीसाठी टँकरवाल्यांकडून सरपंचांसह पदाधिकारी ग्रामसेवक मलिदा खातात. आता खासगी शुद्ध पाणीवाले फिरुन थेट लोकांच्या खिशातून पैसे मिळवत आहेत.

हे व्हायला हवे
टँकरने पिण्यायोग्य शुद्ध पाणीच पुरवठा करायला हवा शिवाय या हागणदारीमुक्त तालुक्यात आता घरोघरी शौचालये झाली आहेत. पण शासन माणसी २० लिटरच पाणी मंजूर करते. त्यातले मिळते किती हा प्रश्नच आहे. या निकषात बदल करायला हवा. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माणसांबरोबर मोठ्या जनावराला ३० लिटरप्रमाणे पाणी टँकरने दिले होते. ते यावर्षीही द्यायला हवे. सध्या टँकरशिवाय १८ विहिरी आणि ३ बोअर दररोज ४०० रुपये देऊन पिण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यांच्यासह टँकरवर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक नेमून फसवणूक करणाºयांवर फौजदारी दाखल करावी.

विठलापूर (ता. आटपाडी) येथे १० रुपयाला घागर या दराने नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.

 

Web Title:   Due to drought, the new way of income in Atpadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.