बेसुमार वाळू उपशामुळेच मगरी नदीकाठावर

By Admin | Updated: April 27, 2015 00:10 IST2015-04-26T22:49:06+5:302015-04-27T00:10:37+5:30

बेसुमार वाळू उपशामुळेच मगरी नदीकाठावर

Due to the difficult sand rush, | बेसुमार वाळू उपशामुळेच मगरी नदीकाठावर

बेसुमार वाळू उपशामुळेच मगरी नदीकाठावर

तबरेज खान, मुस्तफा मुजावर यांचे मत
मागील काही महिन्यांपासून कृष्णा नदीत महाकाय मगरींचा वावर वाढत चालला आहे. मगरींनी माणसांवर देखील हल्ले करुन काही जणांचा बळी घेतला आहे. या मगरींचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनांसमोर आहे. परंतु अचानक नदीपात्रात मगरी कशा वाढल्या? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसेच वाढते तापमान आणि पाण्याची टंचाई यामुळे पक्ष्यांचा हकनाक जीव जात आहे. यासह अन्य विषयांवर नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे तबरेज खान आणि इन्साफ या प्राणीमित्र संघटनेचे मुस्तफा मुजावर यांच्याशी हा थेट संवाद...


कृष्णा नदीपात्रात अचानक मगरींचा वावर का वाढला आहे?
- वास्तविक या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. कृष्णा नदीपात्रात पूर्वीपासूनच ‘इंडियन मार्श’ या प्रकारातील मगरी आहेत. सध्या देखील माई घाट ते भिलवडी या पट्ट्यात अंदाजे पंधरा मोठ्या मगरी आहेत. केवळ त्यांनी आता त्यांचे वस्तीस्थान बदलले आहे. याला कारणीभूत देखील आपणच आहोत. काही वर्षांपासून ज्या ठिकाणी मगरींचे वस्तीस्थान आहे, नेमक्या त्याच भागात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. कित्येक ठिकाणी वाळू उपशामुळे १० ते १५ फूट खड्डे पडले आहेत. साहजिकच मगरींनी तेथून स्थलांतर केले आहे आणि त्या घाट परिसरात आल्या आहेत. आपण ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.
मगरी नागरिकांवर हल्ला करीत आहेत व त्यामध्ये निष्पापांचा बळी जात आहे, त्याचे काय ?
- दुर्दैवाने मगरींच्या हल्ल्यामध्ये निष्पापांचा जीव जात आहे, हे वास्तव आहे. त्यामुळेच तातडीने वन खात्याने मगरींचा बंदोबस्त करावा, अशी समस्त प्राणीमित्र संघटनांची मागणी आहे. परंतु आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, नदी हा मगरींचा अधिवास आहे. सध्या मगरींचा प्रजनन काळ सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रावर कोणी अतिक्रमण केले, तर त्यांचे कार्यक्षेत्र रक्षणासाठी त्या हल्ला करतात. नागरिक जेव्हा नदीवर धुणे धुतात, अंघोळ करतात, त्यावेळी पाण्यात एक प्रकारची कंपने निर्माण होतात. संबंधित क्षेत्रात जर मगरींचे वास्तव्य असेल आणि त्यावेळी मगरी जवळ असतील, तर त्या त्यांच्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर हल्ला करतात.
यामध्ये प्राणीमित्र संघटनांची काय भूमिका आहे ?
- मगरींप्रमाणेच नागरिकांचा जीव देखील महत्त्वाचा आहे. वन विभागाच्यावतीने मगरींच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याला प्राणीमित्र संघटनादेखील मदत करीत आहेत. निदान जोपर्यंत मगरी सापडत नाहीत, तोपर्यंत तरी सुरक्षितता म्हणून नागरिकांनी शक्यतो नदीत जाणे टाळावे. नागरिकांनी नदीत मेलेली जनावरे तसेच वेस्ट चिकन टाकू नये. याबाबत आमच्याकडून प्रबोधनाचे कार्य सुरु आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने प्रामुख्याने घाट परिसरात विशिष्ट अंतरावर लोखंडी जाळ्या बसवाव्यात, असा प्रस्ताव आम्ही प्रशासनापुढे मांडला आहे. त्याचप्रमाणे धुणे धुण्यासाठी स्वतंत्र धोबी घाटाची निर्मिती करणे गरजेचे आहे. जेणेकरुन तेथे मगर येऊ शकणार नाही.
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने पशु - पक्ष्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे...
- मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता आणि पाण्याचे दुर्भीक्ष्य यामुळे सुमारे १२५ हून अधिक पक्षी दगावले होते. यंदा केवळ दोन महिन्यामध्ये आम्ही ५६ पक्ष्यांवर प्रथमोपचार केले असून त्यापैकी ३२ पक्षी मृत्यू पावले आहेत. नागरिकांनी त्यांच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच ज्यांच्या घरापुढे अंगण आहे, त्यांनी या कालावधित झाडे तोडू नयेत. कारण झाडांमुळे पक्ष्यांना गारवा मिळतो. मांजर सांभाळणारे बहुतेकवेळा त्यांची पिले रस्त्याकडेला सोडतात. तसेच मनपाने नसबंदीचा फार्सच केल्यामुळे रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांच्या पिलांचा देखील उन्हामुळे जीव जात आहे. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांचे जीवन वाचविणे हे काही प्रमाणात तरी आपल्या हातामध्ये आहे.
रस्ते अपघातातदेखील मोठ्या प्रमाणात प्राण्यांचे बळी जात आहेत...
- सध्या आपण स्वकेंद्रित झालो आहोत. त्यामुळे प्राण्यांकडे पाहण्यास तर आपल्याला वेळच नाही. प्रामुख्याने पहाटे आणि रात्रीच्या वेळी रहदारीच्या रस्त्यावर कुत्री, मांजरे, गाढव आदी प्राणी वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडतात. मागीलवर्षी वाहनांच्या धडकेने १९८३ प्राण्यांनी जीव गमावला आहे.
अपघातात प्राणी मृत्युमुखी पडू नयेत याबाबत प्राणी मित्र संघटना काय करते?
- कितीही झाले तरी आमची संस्था ही ‘स्वयंसेवी’ या गटात मोडते. साहजिकच आमच्यावर बंधने येतात. पैशाची कमतरता जाणवते. तरीही इन्साफ संघटनेने प्राण्यांसाठी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. आमचे हेल्पलाईन क्रमांक ९८८१२४७५२० आणि ९०२१५१६१७५ असे असून या क्रमांकावर नागरिक आमच्याशी संपर्क साधतात. त्यानंतर तातडीने आम्ही घटनास्थळी जाऊन जखमी प्राण्यास घेऊन शासकीय रुग्णालयात जातो किंवा परिस्थिती बघून स्वत:ही उपचार करतो आणि त्या प्राण्याचा जीव वाचवितो. प्रशासनाने रहदारीच्या रस्त्यावर ठराविक अंतरावर प्राणी अपघाताबाबत फलक लावून जागृती करणे गरजेचे आहे. पशु-पक्षी हे देखील समाजाचे घटक असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली, तर उन्हाळ्यात पक्ष्यांचे पाण्याअभावी आणि प्राण्यांचे अपघातात बळी जाण्याचे प्रमाण कमी होईल.
४नरेंद्र रानडे

Web Title: Due to the difficult sand rush,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.