उकळत्या रश्श्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, पातेल्यात पडून ६५ टक्के भाजला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 15:27 IST2017-10-22T15:27:10+5:302017-10-22T15:27:21+5:30

उकळत्या रश्श्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, पातेल्यात पडून ६५ टक्के भाजला होता
मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
शेडशाळ येथे रमेश कुंभार यांचा धनश्री ढाबा आहे. घरापासून जवळच ढाबा असल्याने रमेश कुंभार यांचा बालवाडीत शिकणारा मुलगा प्रवीण हा दररोज ढाब्यावर येत होता. दि. १० रोजी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे ढाब्यावर आला होता. याच्याकडे लक्ष देणारे त्याचे आजोबा, नातेवाईक रुग्णालयात असल्याने ढाब्यावर उपस्थित नव्हते. कामगार कामात असल्याने त्यांचे प्रवीणकडे दुर्लक्ष झाल्याने ढाब्यावर तयार करून ठेवलेल्या रश्श्यात प्रवीण पडला.
गंभीर भाजल्याने आरडाओरडा करणा-या प्रवीणला पातेल्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पाय व चेहरा वगळता पूर्ण शरीर भाजल्याने प्रवीणचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसात नोंद आहे