जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

By admin | Published: October 16, 2015 11:08 PM2015-10-16T23:08:05+5:302015-10-16T23:10:21+5:30

सांगली जिल्हा : दुष्काळ की टंचाई परिस्थिती; याबाबत संभ्रम कायम

Drought in 363 villages in the district | जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

जिल्ह्यातील ३६३ गावांत दुष्काळ

Next

सांगली : पावसाने फिरवलेली पाठ आणि टंचाई परिस्थिती गंभीर होत चालली असतानाच, शुक्रवारी राज्य शासनाने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. मात्र, नक्की ‘दुष्काळी’ की ‘टंचाईसदृश’ गावे, याबाबत रात्रीपर्यंत तरी साशंकता कायम होती. जिल्हा प्रशासनाकडेही याबाबत ठोस माहिती नसल्याने जिल्ह्यातील ‘ती’ ३६३ गावे कोणती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील दुष्काळी गावांची यादी प्राप्त होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
यंदा मान्सूनने दगा दिल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊसमान जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव तालुक्याचा काही भागाला टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परतीच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला असला तरी, ही तात्पुरती मलमपट्टी पुरेशी नसल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकरी बाळगून होता.
अखेर आज मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील १४ हजार ७०८ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केल्याची माहिती सोशल माध्यमातून जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील गावांच्या समावेशाविषयी उत्सुकता वाढली होती. कारण दुष्काळी अथवा टंचाई परिस्थितीत गावांना शासकीय फायदे मिळत असल्याने व इतर फीमध्ये सवलत अथवा माफी मिळत असल्याने आपल्या गावाचा यादीत समावेश आहे का, याची प्रत्येकजण खात्री करून घेत होता.
सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागात संपर्क साधल्यानंतरही याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, जिल्ह्यातील ३६३ गावांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी राज्य शासनाने टंचाईसदृशची घोषणा होत असताना तालुक्यांची नावे घोषित करण्यात येत होती. मात्र, यावेळी तालुक्यांऐवजी गावांचीच नावे घोषित करण्यात आल्याने संभ्रमात भर पडली आहे. त्यात शासकीय स्तरावर दुष्काळ जाहीर करण्यात अनेक अडचणी असल्याने टंचाई परिस्थिती जाहीर झाली असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)


शासनाकडून सवलतींचा वर्षाव...
घोषित केलेल्या सवलतींनुसार कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी खरेदी केंदे्र तातडीने सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: Drought in 363 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.