वाळवा तालुक्यातील ४९ गावांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:11+5:302020-12-05T05:06:11+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ४९ गावांमधील गावठाण हद्दीचे आधुनिक पद्धतीच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी भूमिअभिलेख व नगरमापन विभागाच्या यंत्रणेने जय्यत ...

वाळवा तालुक्यातील ४९ गावांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण;
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ४९ गावांमधील गावठाण हद्दीचे आधुनिक पद्धतीच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी भूमिअभिलेख व नगरमापन विभागाच्या यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. मानवी चुका टाळून अचूक आणि गतीने हे काम केले जाणार आहे. त्यातून ग्रामस्थांना सनद, मिळकत पत्रक, नकाशे असे मालकी हक्क सिद्ध करणारे दस्तऐवज दिले जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेखचे उपअधीक्षक अशोक चव्हाण यांनी दिली.
या ड्रोन सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील हे समितीचे अध्यक्ष असून चव्हाण हे सदस्य सचिव आहेत. या समितीत तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, ग्रामविस्तार अधिकारी सदस्य आहेत.
चव्हाण म्हणाले, शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम भूमिअभिलेख, ग्रामविकास विभाग आणि केंद्र शासनाच्या सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविला जाणार आहे. त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित केले आहेत. सर्वेक्षण करण्याच्या एक दिवस अगोदर त्या गावामध्ये जनप्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी आपापल्या मालमत्तांचे सीमांकन करून घ्यायचे आहे. बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांना त्याची आगाऊ माहिती द्यावयाची आहे. शासकीय जागा, ग्रा.पं.च्या जागा, सार्वजनिक वापराच्या जागांचे सीमांकन सर्वेअर आणि तलाठी यांच्या मदतीने करून घेतले जाणार आहे.
ते म्हणाले, गावठाणातील जागांबाबत वाद असल्यास त्या तक्रारीची चौकशी करून योग्य तो निर्णय झाल्यानंतर अशा जागांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असणार आहे.
चौकट
ड्रोनची आधुनिकता
पूर्वी पारंपरिक पद्धतीने चार हजार गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी १०० वर्षे लागली. मात्र आता ड्रोनद्वारे आधुनिक पद्धतीने राज्यातील ४० हजार खेडी, गावांचे सर्वेक्षण अवघ्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.
तंटे, वादाला पूर्णविराम
ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणात अधिक अचूकता असणार आहे. मानवी चुकांना त्यामध्ये स्थान असणार नाही. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाला आपल्या हक्काच्या मिळकतीची सनद, मिळकतपत्र आणि नकाशा मिळणार आहे.