सिलिंडर दरवाढीने साखरमाळांना महागाईचा कडवटपणा, दरात दुप्पट वाढ
By अविनाश कोळी | Updated: March 21, 2023 17:04 IST2023-03-21T17:04:24+5:302023-03-21T17:04:58+5:30
काही प्रमाणात नफेखोरीच्या उद्देशानेही दरवाढ केल्याचा संशय

सिलिंडर दरवाढीने साखरमाळांना महागाईचा कडवटपणा, दरात दुप्पट वाढ
अविनाश कोळी
सांगली : साखरेचे दर स्थिर असले तरीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात व मजुरीत झालेल्या वाढीचा फटका गुढी पाडव्याच्या साखरमाळांना बसला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा दरात दुप्पट वाढ झाली आहे.
येत्या २२ मार्च रोजी गुढीपाडवा असल्याने सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर साखरमाळांची आवक सुरू आहे. दरवर्षी सणाला माळांची मोठी उलाढाल होत असते. मागील वर्षाप्रमाणेच यंदा चांगले उत्पादन आहे. मात्र, दरवाढीमुळे ग्राहकांत नाराजी आहे.
मागील वर्षी ९० ते ११० रूपये किलोप्रमाणे विकल्या जाणाऱ्या साखरमाळा आता २१० ते २२० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात नफेखोरीच्या उद्देशानेही दरवाढ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
साखरेचे दर स्थिर
मागील वर्षी साखरेचा दर प्रतिकिलो ३७ रूपये होता. यंदा साखर ३८ रूपये किलो आहे. दरात किरकोळ वाढ झाली आहे.
२ हजार १०० रुपयांना सिलिंडर
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात नुकतीच ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत व्यावसायिक सिलिंडर महागल्याने त्याचा फटका साखरमाळांच्या दरावर झाला. जी साखरमाळ मागील वर्षी १० रुपयाला मिळत होती ती आता २० ते २५ रुपयांना विकली जात आहे.
मजुरीही वाढली
मागील वर्षी २५० ते ३०० रूपये प्रतिदिन मजुरी घेणाऱ्या कामगारांना यंदा ४०० ते ५०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळेही दरावर परिणाम आहे.
मालाची उपलब्धता, मागणी कमी
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात साखरमाळांची आवक होत आहे. उत्पादन मोठे असले तरी अद्याप माळांना मागणी नसल्याचे चित्र आहे.
साखरमाळांचे दर मागील वर्षापेक्षा दुप्पट झाले आहेत. सिलिंडरचे दर तसेच मजुरी वाढल्याने हा परिणाम दिसून येतो. सध्या ग्राहकांतून मागणी कमी आहे. गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मोठी उलाढाल अपेक्षित आहे. - गणपती जाधव, साखरमाळा उत्पादक व विक्रेते, सांगली