मांजर्डे : डोर्ली (ता. तासगाव) येथे २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेकांनी घरपट्टी भरली नसतानासुद्धा ग्रामसेवकांकडून थकबाकी नसल्याचे बोगस दाखले घेऊन निवडणूक लढविली आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याबाबतचा तक्रार अर्ज नागेश पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे केली आहे.
डोर्ली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काहींनी घरपट्टी चुकवून ग्रामसेवकांकडून थकबाकी नसलेले बोगस दाखले मिळविले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कर भरला गेला नाही. यांपैकी काहीजण निवडणुकीत निवडून सदस्य झाले आहेत; तर काहींनी निवडणुकीनंतर थकबाकी भरली आहे.
ग्रामपंचायतीची थकबाकी असताना ग्रामसेवकांनी थकबाकी नसलेले दाखले दिलेच कसे? हा कायद्याचा भंग आहे. याची चौकशी करून १५ दिवसांत दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रामसेवक यांनी नियमबाह्य दाखले देणे असे प्रकार घडल्यामुळे प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत ग्रामसेवक कुंभार यांनी संबंधितांनी घरपट्टी भरण्याचे आश्वासन दिले होते म्हणून थकबाकी नसलेला दाखला देण्यात आला असल्याचे सांगितले.