हाॅटेल उघडली म्हणून जीभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:25+5:302021-07-17T04:21:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले ...

Don't pamper your tongue as the hotel opens, take care of the rainy season | हाॅटेल उघडली म्हणून जीभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा

हाॅटेल उघडली म्हणून जीभेचे लाड नको, आला पावसाळा पोट सांभाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू असताना आता पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील बदल आणि दमटपणामुळे केवळ व्हायरल इन्फेक्शनसोबतच पावसाळ्यात पोटाशी निगडीत आजारही होऊ शकतात. यामध्ये कॉलरा, डायरिया किंवा जुलाब या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा समावेश आहे. शिवाय हाॅटेलमधील जड पदार्थांमुळेही पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाशी लढता लढता या आजारांचीदेखील काळजी घेण्याची गरज आहे.

पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यासाठी पाणी उकळून, थंड करून पिणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यात ओलाव्यामुळे विषाणू हवेत दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे उघड्यावरील अन्न, शिळे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवतात. पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यानेही पित्ताचे विकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

चौकट

पावसाळ्यात हे खायला हवे

१. फळे, मोसंबी, डाळिंबासह सर्वप्रकारची फळे.

२. आहार नेहमी गरमागरम असावा.

३. तूर, मुगाची डाळ, इडली, डोसा, उपमा.

४. डिंकाचे, अहळीवाचे लाडू, तूप.

५. पालेभाज्यांचे सूप, सर्व फळभाज्या, बटाटा व वांग्याचे प्रमाण कमी असावे.

६. जेवणात लिंबाची फोड असावी.

७. गरम दुधात चिमूटभर हळद किंवा सुंठपूड मिसळावी.

चौकट

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

१. शिळे अन्न, पचायला जड, थंड पदार्थ, दही, लोणी, खव्यापासून बनलेले पदार्थ.

२. मोड आलेली धान्ये, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ.

३. बेकरीचे पदार्थ, मांस खाणे टाळावे.

४. आयुर्वेदानुसार हिरव्या पालेभाज्या खाण्याचे टाळावे.

चौकट

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्यात बाहेर फिरायला जावेसे वाटते. अशावेळी बाहेर खाणे होते. पण तिथे आवश्यक ती स्वच्छता पाळली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळावे. विशेषत: उघड्यावरील अन्नामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात अर्धवट शिजलेले अन्न खाल्ले तरी त्याचा त्रास होऊ शकतो. या पदार्थांमुळे आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

चौकट

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळ्यात वात दोषाचा प्रकोप होतो. त्याला कफ व पित्ताची साथ मिळते. त्यातून सर्दी, दमा, संधीवात, भूक मंदावणे, उलट्या, त्वचा विकाराचा त्रास होतो. पित्तामुळे अतिसार, ताप, आल्मपित्त होतात. त्यासाठी पावसाळ्यात पचनाला जड पदार्थ खाऊ नये. शिळे व अतिथंड पदार्थही टाळावेत. पावसाळ्यात समतोल आहार व पाणी उकळून पिण्याची गरज आहे.

- डाॅ. अमोल पवार, आयुर्वेदतज्ज्ञ

कोट

पावसाळा व आजार यांचा जवळचा संबंध आहे. सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात आढळून येतात. या आजारांवर घरीच उपचार घेऊ नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत. एका रुग्णासाठी आणलेले औषध दुसऱ्या रुग्णाला देऊ नये. रोगप्रतिकारशक्ती मंदावत असल्याने आहाराचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पिण्याचे पाणी उकळून प्यावे. उघड्यावरील पदार्थ टाळावेत.

- डाॅ. सुहास पाटील, फिजिशियन

Web Title: Don't pamper your tongue as the hotel opens, take care of the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.