सांगलीतील कुपवाडमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके, नातेवाइकांनी पुन्हा केले अंत्यसंस्कार
By श्रीनिवास नागे | Updated: May 8, 2023 14:26 IST2023-05-08T14:26:07+5:302023-05-08T14:26:18+5:30
या घटनेने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगलीतील कुपवाडमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके, नातेवाइकांनी पुन्हा केले अंत्यसंस्कार
कुपवाड (सांगली) : शहरातील एका स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर नातेवाइकांनी ते अवयव गोळा करून पुन्हा अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
कुपवाड शहरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. रात्री उशिरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मृतदेह दहन केल्यानंतर नातेवाईक निघून गेले. सकाळी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाला नातेवाईक आले असता अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नातेवाइकांनी ते अवयव गोळा करून पुन्हा त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहरातील स्मशानभूमीत कायमस्वरूपी कामगाराची नियुक्ती करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
शहरातील मुख्य रस्त्यालगत चिकन, मटण दुकाने आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचे कळप फिरताना दिसतात. ‘डाॅग व्हॅन’ आली की, कुत्री गायब होतात. एक किंवा दोन कुत्री पकडून कामगिरी झाली, असे म्हणून डाॅग व्हॅन निघून जाते. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलासह, महिला, शालेय विद्यार्थी व पादचारी नागरिकांवर हल्ले केले आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.