रताळी, गाजरे कोठे लागतात, माहीत आहे का?
By Admin | Updated: September 1, 2015 22:14 IST2015-09-01T22:14:08+5:302015-09-01T22:14:08+5:30
जयंत पाटील : मिरजेतील मेळाव्यात शासनावर टीका; दुष्काळप्रश्नी आंदोलन उभारण्याचा इशारा

रताळी, गाजरे कोठे लागतात, माहीत आहे का?
मिरज : रताळी व गाजरे कोठे लागतात, याची माहिती आताच्या राज्यकर्त्यांना नाही. कुंभमेळ्यात गुंतलेल्या या राज्यकर्त्यांना दुष्काळाबाबत गांभीर्य नाही, अशी टीका मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी केली. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, चारा छावण्या व चारा डेपो सुरू करा, म्हैसाळ योजनेचे २२ कोटी पाणीपट्टी व साडेचार कोटी वीजबिल माफ करा, अशा मागण्या आ. पाटील यांनी केल्या.परतीचा पाऊस पडला नाही, तर जिल्ह्यात भयानक अवस्था होणार आहे. दुष्काळाबाबत संवेदनशील नसलेल्या शासनाविरुध्द राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, युती शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. कांद्याचा वाढलेला भाव शेतकऱ्यांना न मिळता परदेशातून आयात केलेल्या कांद्यालाच मिळाला आहे. शेतीमालाचे दर वाढले म्हणजे महागाई वाढली, असा अपप्रचार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाचा उत्पादन खर्च मिळाला पाहिजे. ऊस पिकावर बंदी घालण्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. साखर निर्यातीवर बंदी आणि उसाला व साखरेला दर नसल्याने कारखाने शेकडो कोटीच्या तोट्यात आहेत. शासनाच्या या धोरणामुळे सहकारी कारखाने टिकणे अवघड आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनाएफआरपी देणेही कारखान्यांना शक्य नाही. रताळी व गाजरे कोठे लागतात याचीही राज्यकर्त्यांना माहिती नाही. पंतप्रधान मोदी लोकसभेत कमी आणि परदेशातच जास्त दिसतात. देशातील नागरिकांऐवजी परदेशातील भारतीयांच्या हिताची त्यांना जास्त काळजी आहे.
युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, आप्पासाहेब हुळ्ळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, सदानंद कबाडगे, भारत कुंडले, गंगाधर तोडकर, साहेबराव जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)
दोन वर्षात विधानसभेच्या निवडणुका
भाजप व शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद आहेत. शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याने, दोन वर्षात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे. बाजार समितीत आमचा निसटता पराभव झाला आहे. मात्र जिल्हा परिषद, जिल्हा बँक आपल्याकडे आहे. मिरज तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगले यश मिळविल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.