वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:26 IST2021-03-18T04:26:07+5:302021-03-18T04:26:07+5:30
इस्लामपूर येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष कारंडे यांना सम्राट महाडिक यांनी निवेदन दिले. यावेळी शंकर पाटील, विकास दाभोळे, प्रवीण ...

वीज कनेक्शन तोडू नये अन्यथा तीव्र आंदोलन
इस्लामपूर येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष कारंडे यांना सम्राट महाडिक यांनी निवेदन दिले. यावेळी शंकर पाटील, विकास दाभोळे, प्रवीण चिकुर्डेकर, इंद्रजित पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : घरगुती व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये यासाठी इस्लामपूर येथे वाळवा-शिराळा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कारंडे यांना भाजपचे प्रदेश कार्य समिती सदस्य सम्राट महाडिक यांनी निवेदन दिले. यावेळी पेठचे माजी उपसरपंच शंकर पाटील, विकास दाभोळे, भाजपा विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर, इंद्रजित पाटील उपस्थित होते.
या निवेदनामध्ये देशात मार्च २०२० पासून कोरोनाने थैमान घातले असून, या महामारीत अनेक लोक बाधित झाले आहेत. तसेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना लॉकडाऊनमुळे घरीच थांबावे लागले होते. अशा परिस्थितीत उद्योगधंदे व रोजगार पूर्णपणे बंद पडलेला होता. सामाजिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने घरगुती व कृषी वीज बिल माफ करण्याचे जनतेला आश्वासन दिले होते. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. आता ज्या वीज ग्राहकांची वीज बिले थकीत आहेत. त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया कार्यालयाने सुरू केलेली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करुन घेण्याची जबाबदारी जेवढी जनतेची आहे. तेवढीच कार्यालयाची आहे. कोणत्याही वीज ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडले जाऊ नयेत अशा सूचना आपल्या विभागातील प्रत्येक कार्यालयास देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चाैकट
शेतीचाही विचार व्हावा
सध्या पीक परिस्थितीचा विचार करता सुरुच्या उसाच्या लागण, उसाचे गेलेले खोडवे, गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे नाही. याचा देखील गांभीर्याने विचार व्हावा. अशाही परिस्थितीत वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास वाळवा व शिराळा तालुक्यामध्ये भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.