विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाफीलपणा नको - : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:25 IST2019-07-24T00:16:19+5:302019-07-24T00:25:54+5:30
आगामी विधानसभा तोंडावर आहे, गाफील राहू नका, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाफीलपणा नको - : जयंत पाटील
अशोक पाटील ।
इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे. युवा फळीतील कार्यकर्त्यांची मोट बांधून बुथ कमिट्या सक्षम कराव्यात. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात व परिसरात संपर्क ठेवावा. गाडीच्या काचा लावून ए.सी.तून फिरण्यापेक्षा जनतेत मिसळा. आगामी विधानसभा तोंडावर आहे, गाफील राहू नका, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.
निमित्त होते, १ आॅगस्ट रोजी राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात येणाºया विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचे. परंतु यावेळी जास्त चर्चा झाली, ती आगामी विधानसभेचीच. कारखाना कार्यस्थळावर झालेल्या या बैठकीस इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले, सध्या राजकारणात युवा फळीची कमतरता आहे. अशा युवकांनाच राजकारणात संधी देण्याची गरज आहे. गावा-गावातील बुथ कमिटीवर युवकांनाच स्थान द्या. गावातील सामान्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्या तातडीने सोडवा. जेथे माझी गरज वाटेल, तेव्हा मला थेट कळवा. विधानसभा निवडणूक आल्यानंतरच काहीजण जनसामान्यांच्या संपर्कात जातात. तसे न करता आतापासूनच सामान्यांच्या संपर्कात राहा. त्यांच्या समस्या घरा-घरात जाऊन समजावून घ्या. ७५ हजारपेक्षा कमी मतांचे अधिक्य मिळाले, तर त्याचे काहीही सोयरसुतक नसेल. किमान १ लाखावर मतांचे अधिक्य मिळाले, तरच तो माझा विजय समजेन.
ते म्हणाले, मतदार संघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. परंतु गावातील अंतर्गत वादामुळे दोन—दोन, तीन—तीन गट निर्माण झाले आहेत. याचा तोटा राष्ट्रवादीला होत आहे. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने पूर्ण राज्याची जबाबदारी आहे. मला माझ्यासाठी जास्त वेळ देता येणार नाही. आता ही निवडणूक माझी नसून तुमचीच झाली आहे. त्यामुळे अंतर्गत वाद मिटवून सर्वजण एकदिलाने काम करा.
संधी कधी? : कार्यकर्त्यांची कुजबूज
या बैठकीत जयंत पाटील यांच्या अवतीभोवती असणाºया त्याच त्या चेहºयांबद्दल कार्यकर्त्यांत कुजबूज सुरु होती. राजकारणातील तिसºया व चौथ्या फळीतील युवकांना राजारामबापू उद्योग समूहात संधी देण्याबाबतही यावेळी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.