जिल्ह्यात झेंडू उत्पादकांची दसऱ्याला झाली ‘दिवाळी’
By Admin | Updated: October 25, 2015 00:46 IST2015-10-25T00:44:41+5:302015-10-25T00:46:35+5:30
खुशीचे वातावरण : जोरदार मागणीसह समाधानकारक दर

जिल्ह्यात झेंडू उत्पादकांची दसऱ्याला झाली ‘दिवाळी’
शरद जाधव, सांगली : दसरा, दिवाळी सणातील पूजा आणि सजावटीचा अविभाज्य भाग असलेल्या झेंडूने उत्पादकांना यंदा चांगलीच साथ दिली आहे. जोरदार मागणीसह झेंडूचे दर प्रतिकिलो १६० रुपयांपर्यंत पोहोचल्याने उत्पादकांनी दसऱ्यादिवशीच ‘दिवाळी’ साजरी केली.
मुंबई, पनवेल, पुणे, कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत सांगली परिसरातील फुलांना नेहमीच मोठी मागणी असते. त्यामुळे बाराही महिने फुलांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आता दसरा, दिवाळीसारख्या मोठ्या सणालाच नव्हे तर इतर वेळीही सजावटीसाठी फुलांचा वापर वाढला आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीमुळे यंदा फुलाचे उत्पादन कमी झाले आहे.
मात्र दसऱ्यादिवशी झेंडूला घाऊक बाजारात ५० ते ६० तर किरकोळ बाजारात १५० ते १६० रुपयांपर्यंत दर मिळाला. बहुतांश उत्पादक दसरा आणि दिवाळी सण समोर ठेवून झेंडूचे उत्पादन घेत असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून उत्पादन खर्चही पदरात पडत नसल्याने उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला होता. यंदा मात्र दसरा सणाला चांगला दर मिळाल्याने उत्पादक खुशीत आहेत.
फुलांच्या किमती वाढल्याने हारांच्या किमतीतही वाढ दिसून आली. सांगलीच्या बाजारपेठेत दसऱ्याअगोदर २५ ते ३५ रुपयांना मिळणाऱ्या हाराची किंमत दसऱ्यादिवशी ८० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचली होती; तर तोरणाची पाचशे रुपयांपासून दीड हजारापर्यंत विक्री झाल्याचे हार विक्रेत्यांनी सांगितले.
टंचाई परिस्थितीमुळे उत्पादन कमी झाल्याने दिवाळीलाही झेंडूचा दर असाच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दिवाळीनंतर येणाऱ्या मालालाही चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने गेल्या काही वर्षात प्रथमच झेंडू उत्पादकांनी ‘अच्छे दिन’ अनुभवले आहेत.
इतर फुलांनाही दरवाढीचा ‘सुगंध’
दसऱ्याला झेंडूबरोबरच इतर फुलांनाही चांगली मागणी होती. अपेक्षेपेक्षा फुलांचे उत्पादन कमी असल्याने व बाहेरच्या बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांनी त्याच बाजारात माल पाठवल्याने स्थानिक बाजारात फुलांची कमी आवक झाली. त्यामुळे गलांडा, शेवंतीसह इतर फुलांचीही चढ्या दरानेच विक्री झाली. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फुलांच्या उत्पादनाकडे कमी ओढा दिसून आला. यामुळेच चांगला दर मिळाल्याची शक्यता उत्पादकांनी व्यक्त केली. दिवाळीला फुलांची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दर
गेल्या तीन वर्षांपासून मागणी चांगली असतानाही झेंडू उत्पादकांना केवळ खर्च भागविण्यापुरता दर मिळत होता. ठेकेदारांची साखळी आणि जादा उत्पादनामुळे दर घसरत चालला होता. यंदा मात्र दसरा सणाला किरकोळ विक्री १५० ते १६० रुपयांपर्यंत गेली, तर घाऊक बाजारात ४० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने उत्पादकांना फायदा झाला. सणाच्या दोन दिवस अगोदर झेंडूला मागणी वाढल्याने फुलांची तोड करताना उत्पादकांची तारांबळ उडाली.
दलालच झाले सर्वाधिक मालामाल
झेंडू उत्पादकांना यंदा दसऱ्याने समाधानकारक फायदा मिळवून दिला असला, तरी मुंबईसह राज्यातील इतर बाजारपेठेत माल पाठविणाऱ्या उत्पादकांपेक्षा दलालांना जादा फायदा झाल्याचे दिसून आले. उत्पादकांना ४० रुपयांपर्यंत दर देऊन खरेदी केलेल्या झेंडूची ७० ते ८५ रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने दलालांनी विक्री केली. शिवाय उत्पादकांकडून १५ टक्के कमिशन मिळत असल्याने उत्पादकांपेक्षा दलालांचा फायदा झाल्याचे दिसून आले. उत्पादक स्वत: फुले घेऊन फूल मार्केटला जाऊ शकत नसल्यानेही याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला.