District is on the verge of disaster for eight months ..! | सांगली जिल्हा आठ महिने आपत्तीच्या फेऱ्यातच..!
सांगली जिल्हा आठ महिने आपत्तीच्या फेऱ्यातच..!

ठळक मुद्दे जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

शरद जाधव ।
सांगली : कधी पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य, कधी महापुराचा प्रलय, तर कधी परतीच्या मान्सूनचा फटका आणि अजूनही जिल्ह्यावर घोंघावत असलेला अवकाळी पावसाचा तडाखा अशा नैसर्गिक आपत्तीच्या फेºयात जिल्हा पुरता अडकला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील आपत्ती कायम असल्याने प्रशासनालाही कसोटीला सामोेरे जावे लागत आहे.

एकापाठोपाठ एक येत असलेल्या आपत्तीमुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झाले आहेच शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची तीव्र टंचाई भासत असते. अशा स्थितीत पुढील सहा महिने पाणी नियोजनाचे दिव्य जनतेपुढे असते. यंदाही जिल्ह्यात फेब्रुवारीदरम्यान सुरू झालेले पाण्याचे टॅँकर जुलै महिन्यापर्यंत चालूच होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह अन्य भागात एकावेळी ३२० हून अधिक टॅँकर चालू होते, तर पाणी टंचाईमुळे ४ लाख ८० हजारहून अधिक जनता बाधित झाली होती.

निर्धारित वेळेत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होईल, हा अंदाज यंदाही फोल ठरल्याने जुलै मध्यापर्यंत काही भागात टॅँकर सुरूच होते. पाणीटंचाईचे नियोजन करून थोडी उसंत मिळत असतानाच, आॅगस्ट महिन्याची सुरुवातच सांगलीकरांना महापुराच्या कटू अनुभवाने झाली. सुरुवातीला २००५ ची पातळीही गाठणार नाही, अशा वाटणाºया पुराने ५७ फुटांपर्यंत मजल मारत सांगली शहरासह जिल्ह्यातील १०४ गावांचे होत्याचे नव्हते करून टाकले. महापुराने ५५ हजारांवर हेक्टरवरील शेती

जमीनदोस्त झाली, तर १५ हजार ५२९ व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान झाले. महापुरामुळे ८८ हजार ६०० कुटुंबे बाधित झाली असून, अद्यापही त्यातील बहुतांशजणांचे दैनंदिन जीवन बाधित आहे.

महापुराच्या कटू आठवणीतून जिल्हा सावरत असतानाच जिल्ह्यात परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतीसह घरे, जनावरे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. सलग आठ महिन्यांपासून आपत्ती झेलत असलेल्या जिल्ह्यातून परतीच्या मान्सूनने ह्यएक्झीटह्ण घेतली असली तरी, त्यानंतर लगेचच अवकाळीने थैमान घालण्यास सुरुवात केली व त्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यासह इतर ५५ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिके अक्षरश: कुजू लागली आहेत. तरीही पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत.

Web Title: District is on the verge of disaster for eight months ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.