कुपवाडमधील जि. प. शाळेसमोरील खोकीधारकांना नोटिसा
By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-27T23:19:38+5:302015-04-28T00:31:21+5:30
खोकीधारकांत नाराजी : शाळेसमोरील अतिक्रमणे तात्काळ काढून घेण्याचे आदेश

कुपवाडमधील जि. प. शाळेसमोरील खोकीधारकांना नोटिसा
कुपवाड : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण केलेल्या ३८ खोकीधारकांना पंचायत समितीकडून कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा नोटिसीद्वारे त्यांना देण्यात आला आहे.
कुपवाड विकास सोसायटी चौकातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक, उर्दू शाळा आणि शाळा क्रमांक दोनच्या जागेवर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शहरातील ३८ खोकीधारकांकडून व्यवसायासाठी खोकी बसविण्यात आली आहेत. गेल्या वीस वर्षांपासून याठिकाणी या खोकीधारकांचा व्यवसाय सुरू आहे. २००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली महापालिकेने शहरातील खोकीधारकांवर कारवाई केली. प्रशासनाने त्यांच्याकडून खोकी पुनर्वसनासाठी रकमा घेतल्या. त्यातील काहीजणांना महापालिकेच्या मिरज रस्त्यावरील पाण्याच्या टाकीच्या चौकात गाळेही देण्यात आले. काहींनी गाळे घेतले, काहींना गाळे मिळाले नाहीत. त्यामुळे खोकी याठिकाणी पुन्हा ठेवण्यात आली. पूर्वी रस्त्यावर महापालिकेच्या जागेत असलेली खोकी नंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ठेवण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रश्न जिल्हा परिषदेकडे गेला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष आणि खोकी संघटनेचे पदाधिकारी यांनी खोकी पुनर्वसनाबाबत तीन वर्षापूर्वी बैठकाही घेतल्या. परंतु, त्यावेळी हा प्रश्न सुटला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेऊन तिन्ही शाळांच्या आवारातील ३८ खोकीधारकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांनी तात्काळ आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे काढून टाकली जातील, असा इशारा गटशिक्षणाधिकारी यांनी खोकीधारकांना नोटिसीद्वारे दिला आहे. ही खोकी तात्काळ काढून न टाकल्यास पोलीस बंदोबस्तात ही खोकी काढली जातील. नुकसान झाल्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी नोटिसीत नमूद केले आहे. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या युगात या खोक्यांमधून व्यवसाय करून आपला संसार करणाऱ्या खोकीधारकांमध्ये या नोटिसीमुळे नाराजी पसरली आहे. जिल्हा परिषद किंवा महापालिकेने खोक्यांचे त्वरित पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (वार्ताहर)
महापालिकेकडून चालढकल..
२००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शहरातील खोकीधारकांना पुनर्वसनाचे आश्वासन तत्कालीन काँगे्रस पदाधिकाऱ्यांनी दिले होते. आता त्यांचीच सत्ता महापालिकेत आहे. तरीही त्यांच्याकडून या खोकीधारकांचे पुनर्वसन केले जात नाही. खोकीधारकांना पोकळ आश्वासने देऊन चालढकल केली जात आहे. याबद्दल खोकीधारकांत नाराजी आहे. जिल्हा परिषदेने तरी खोकीधारकांना गाळे देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी काही खोकीधारकांकडून करण्यात आली आहे.