जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घड्याळात गटबाजीची किटकिट!
By Admin | Updated: July 3, 2014 01:00 IST2014-07-03T00:54:18+5:302014-07-03T01:00:45+5:30
पक्षांतर्गत कुरघोड्या : दिनकर पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांत संघर्ष; पक्षीय कार्यालयाकडे कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ

जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घड्याळात गटबाजीची किटकिट!
अविनाश कोळी, सांगली : एकसंधपणाचा दावा करीत जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळातील ‘टिकटिक’ आता बिघडली आहे. गटबाजीच्या काट्यांमुळे ‘टिकटिक’ऐवजी ‘किटकिट’ सुरु झाल्याने स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण रंगल्यानंतरही नेत्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षीय कार्यालयापासून दूर राहणे पसंत केले आहे.
गेल्या दोन वर्षात झालेले पदाधिकाऱ्यांमधील बदल, लोकसभा निवडणुकीत पक्षीय धोरणाविरुद्ध अनेकांनी घेतलेली स्वार्थी भूमिका, अशा सर्व गोष्टींमुळे राष्ट्रवादीतील वातावरण गढूळ बनले आहे. उघडपणे दोन गट पडले आहेत. अंतर्गत कलहाने गेल्या वर्षभरात एकही कार्यक्रम, आंदोलन कार्यकर्त्यांना करता आले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढत आहे.
सांगलीतील अन्य पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी एकसंध असल्याचा दावा केला जात असे. घड्याळाचे काटे जसे एकमेकांना पूरक असतात, तशी पक्षाची स्थिती असल्याचे सांगण्यात येत होते. काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीतील वातावरण तसे होते. जिल्हास्तरीय बैठकांनाही बहुतांश नेत्यांची हजेरी असायची. आता परिस्थिती बदलली आहे. एकसंधपणाचा दावा करणारी राष्ट्रवादी विस्कळीत झाली आहे. एकमेकांच्या बैठकांवर अघोषित बहिष्कार टाकणे, कार्यकर्त्यांना दमबाजी करून आपल्या गटातच राहण्याची सक्ती करणे, असे गटबाजीचे रंग उधळले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातच राष्ट्रवादी विस्कळीत होण्यास सुरुवात झाली. संजय पाटील, जतचे नेते विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांची नाराजी वाढत गेली. काहींची हकालपट्टी झाली, तर काहींनी पक्षालाच रामराम ठोकला.
अंतर्गत नाराजीमुळे हैराण झालेल्या राष्ट्रवादीला आता स्वार्थी गटबाजीने त्रस्त केले आहे. शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या गटात आता संघर्ष तीव्र झाला आहे. दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत केलेला भाजपचा प्रचार, निकालानंतर नरेंद्र मोदींसह झळकविलेले स्वत:चे डिजिटल फलक अनेकांना खटकले. पक्षाचे पदाधिकारीच असे पक्षविरोधी वागत असतील, तर कार्यकर्त्यांनी काय करायचे?, असा सवाल उपस्थित होऊ लागला. पाटील यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली. तरीही ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिनकर पाटील यांना पदावर राहण्याची संधी दिली. या गोष्टीवर नाराज असलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एका गटात, तर दिनकर पाटील यांना मानणारे दुसऱ्या गटात विभागले गेले आहेत.
गटबाजीमुळे गेल्या वर्षभरात पक्षीयस्तरावर एकही आंदोलन झाले नाही. कार्यक्रम, बैठकांची औपचारिकता पार पाडली जात आहे. एकमेकांच्या बैठकांना दांडी मारण्याचे उद्योगही सुरू झाल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांना अडचणीचे होत आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रमाणही आता घटले आहे.