जिल्हा बॅँकेच्या रोखपाल, शिपायास अखेर अटक

By Admin | Updated: January 28, 2015 00:54 IST2015-01-27T22:45:56+5:302015-01-28T00:54:13+5:30

अपहार प्रकरण : कोठडीत रवानगी, एकजण अद्याप फरारी

District bank's cashier arrested, arrested at the police | जिल्हा बॅँकेच्या रोखपाल, शिपायास अखेर अटक

जिल्हा बॅँकेच्या रोखपाल, शिपायास अखेर अटक

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुंग (ता. मिरज) येथील शाखेत अपहार केल्याप्रकरणी बँकेतील रोखपाल व शिपायास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रोखपाल जमीर नसरुद्दीन सनदी (वय ४८) व शिपाई नंदकुमार रामचंद्र मोरे (४१, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली अनेक महिने ते फरारी होते. यातील लिपिक प्रतापराव पांडुरंग धनवडे (४१, बागणी, ता. वाळवा) हा अद्याप फरारी आहे.
ग्राहकांनी बँकेत भरलेल्या पैशाच्या नोंदी रेकॉर्डवर न करता पैसे हडप केले होते. सोने गहाण कर्ज योजनेंतर्गत ग्राहकांनी दिलेल्या सोन्यावरही त्यांनी डल्ला मारला होता. ग्राहकांचे लॉकरमधील दागिने घेऊन त्याजागी त्यांनी बनावट दागिने ठेवले होते. यातून त्यांनी २६ लाख ४६ हजारांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी बँकेकडून चौकशी केली जात होती. चौकशीत अपहार झाल्याचे उघडकीस येताच रोखपाल जमीर सनदीसह तिघांविरुद्ध २४ सप्टेंबर २०१४ रोजी सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जुलै ते २ आॅगस्ट २०१४ या कालवधित त्यांनी अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी संशयित फरारी झाले होते. यातील सनदी याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन फेटाळताच त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही जामीन फेटाळला. आठवड्यापूर्वी त्याला अटक केली होती. त्यास पोलीस कोठडीही मिळाली होती. तपासानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. शिपाई मोरे हा २१ जानेवारीला थेट न्यायालयात शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. सध्या तो उद्यापर्यंत (बुधवार) पोलीस कोठडीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: District bank's cashier arrested, arrested at the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.