सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ५ कोटींचे अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:37+5:302021-07-05T04:17:37+5:30
इस्लामपूर : चांदोली अभयारण्यातील ३०५ प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी ९२ लाख रुपयांच्या घरबांधणी अनुदानाचे वाटप करत असून, उर्वरित ३४५ खातेदारांचे ...

सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना ५ कोटींचे अनुदान वाटप
इस्लामपूर : चांदोली अभयारण्यातील ३०५ प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी ९२ लाख रुपयांच्या घरबांधणी अनुदानाचे वाटप करत असून, उर्वरित ३४५ खातेदारांचे अनुदान आठवड्यात वर्ग करण्यात येईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. जलसंपदा खात्यातील नोकर भरतीमध्ये धरण, कालव्याने विस्थापित प्रकल्पग्रस्तांना पाच टक्केऐवजी वीस टक्के जागा देण्याचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
राजाराम नगर येथे कारखाना कार्यस्थळावर पाटील यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील १४ वसाहतींमधील ३०५ प्रकल्पग्रस्तांना प्रत्येकी १ लाख ६१ हजार रुपयांच्या घरबांधणी अनुदान वाटपाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण, उपवन संरक्षक विजय माने, महादेव मोहिते, उत्तम सावंत, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार (पुनर्वसन) तेजस्विनी पाटील, सहाय्यक अभियंता दीपक परळे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, तुम्ही फार हालअपेष्टा सोसल्या आहेत. माझ्या मनात याची सातत्याने सल होती. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. यामध्ये बहुतेक प्रश्न सुटले आहेत, उर्वरितही मार्गी लावू. तालीचे १ कोटी ५९ लाख रुपये मंजूर आहेत. काहीजणांचा निर्वाह भत्ता राहिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना करू. आपल्यातील शिकलेल्या आणि पेठ, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना क्षारपड जमीन मिळाली आहे, त्यांची जमीन जलसंपदा खात्याच्यावतीने सुधारणा करून दिली जाईल.
संजय पाटील यांनी स्वागत केले. धावजी अनुसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब पाटील, विजयराव पाटील, संग्राम पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी किसन मलप, शंकर सावंत, वसंत कदम, ज्ञानदेव पवार, राम सावंत, रामचंद्र सोनावणे, तानाजी पाटील, नामदेव रेवले, दिलीप पाटील, वसंत जाधव उपस्थित होते. नामदेव नांगरे यांनी आभार मानले.
फोटो : ०४ इस्लामपूर १
ओळी : राजाराम नगर येथे जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्तांना घरबांधणी अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाधान चव्हाण, विजय माने, महादेव मोहिते, उत्तम सावंत, अरविंद लाटकर, रवींद्र सबनीस, किसन मलप, धावजी अनुसे, शंकर सावंत उपस्थित होते.