समूह जीवन पध्दतीचा माहिती युगात ऱ्हास

By Admin | Updated: December 26, 2014 00:10 IST2014-12-25T23:12:38+5:302014-12-26T00:10:00+5:30

जी. के. ऐनापुरे : इस्लामपुरात साहित्य संमेलन उत्साहात

Dissemination of group life system information | समूह जीवन पध्दतीचा माहिती युगात ऱ्हास

समूह जीवन पध्दतीचा माहिती युगात ऱ्हास

इस्लामपूर : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात समूह जीवनपध्दती संपुष्टात आली आहे. भांडवलदारी समूहातील एका व्यक्तीची गरज दुसऱ्या समूहाची गरज मारते आहे. जाती—जातीत झगडे सुरू आहेत. अशावेळी आपण ज्यांना ‘चळवळी’ म्हणतो, त्या चळवळी गतिमान नसून सरपटत आहेत. समाज मध्यमवर्ग निर्मितीचा कारखाना बनला आहे. त्यामुळे मराठी साहित्याने स्वत:ची भूमिका प्रस्थापित करून अभिरुचीसंपन्न समाज निर्मितीचे प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जी. के. ऐनापुरे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्यावतीने राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन प्रा. ऐनापुरे बोलत होते.
ते म्हणाले की, अलीकडे संमेलनांची गरज काय, ती व्हावीत की न व्हावीत यावर चर्चा झडत असतात. व्यक्तिपरत्वे यामध्ये मतभिन्नता असू शकते. संमेलने उत्सवी नसावीत. ती बौध्दिक ऊर्जा पुरविणारी आणि समाजाला दिशा देणारी असावीत. शेतीमधून नवी पिढी शिकली. मात्र शेतीपोटीच्या संवेदना बोथट झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगरावबापू पाटील यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह आणि राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा ऐनापुरे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील यांनी स्वागत केले. ‘म.सा.प.’च्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह प्रा. सुभाष खोत यांनी परिचय करुन दिला.
प्रा. डॉ. मंगल कोकाटे यांनी आभार, प्रा. दशरथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. विश्वास सायनाकर, दि. बा. पाटील, कवी वसंत पाटील, डॉ. भीमराव पाटील, अ‍ॅड. बी. एस. पाटील, प्रा. वि. द. कदम, प्रा. एम. एस. हसमनीस, शहानवाज मुल्ला, प्रा. डॉ. दीपक स्वामी, प्रा. राजा माळगी, प्रा. एकनाथ पाटील, श्रीमती वैजयंती पेठकर, गुरुवर्य एस. टी. पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)


लेखक नाचतात व्यवस्थेच्या तालावर
मराठी लेखकांवर कोरडे ओढताना प्रा. ऐनापुरे म्हणाले की, मराठी साहित्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. व्यवस्थेच्या तालावर लेखक नाचत आहेत. त्यामुळे मराठी साहित्याला आता भूमिकाच उरलेली नाही. मराठी साहित्य आधुनिक आणि पारंपरिकही नाही. ते मध्यमवर्गीय अवस्थेत राहिले आहे. नव्या पिढीतील लेखकांनी मराठी साहित्याची नेमकी भूमिका प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करायला हवेत.

Web Title: Dissemination of group life system information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.