‘वसंतदादा’चे संचालक मंडळ बरखास्त करा

By Admin | Updated: July 27, 2014 23:58 IST2014-07-27T23:46:19+5:302014-07-27T23:58:26+5:30

कृती समिती : सांगलीत बैठक; बुधवारी पुन्हा बैठकीचे आयोजन

Dismiss the director board of 'Vasantdada' | ‘वसंतदादा’चे संचालक मंडळ बरखास्त करा

‘वसंतदादा’चे संचालक मंडळ बरखास्त करा

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून गेल्या पंधरा वर्षांतील कारभाराची चौकशी करावी, तसेच संचालक मंडळाच्या मालमत्तेवर टाच आणावी, असा ठराव आज कारखाना बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. येत्या बुधवारी यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी पुन्हा समितीची बैठक होणार आहे.
वसंतदादा कारखाना अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांची बिले भागविण्यासाठी मालमत्ता जप्तीची नोटीसही बजाविण्यात आली आहे. तसेच आयकर विभागानेही कारखान्याच्या गोदामाला सील ठोकले आहे. या पार्श्वभूमीवर सभासद, कर्मचारी, वाहतूकदार यांची आज रविवारी साखर कामगार भवनात बैठक बोलाविण्यात आली होती. कारखाना बचाव कृती समितीचे निमंत्रक आकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
या बैठकीत संचालक मंडळ बरखास्त करून गेल्या १५ वर्षांतील संचालकांच्या कारभाराची चौकशी करावी, कारखान्याने नफा-तोटा पत्रक सभासदांसमोर मांडावे, कारखान्याच्या ठेवी, मालमत्ता असे एकूण २०० कोटींची मालमत्ता असून, त्याच्या विक्रीला बंदी घालावी, ही मालमत्ता सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, सहकार कलम ८३, ८८ व ७८ अन्वये संचालकांची चौकशी करावी, कारखान्याच्या तोट्याला संचालक मंडळ जबाबदार असून, त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा, साखर आयुक्तांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांची बिले भागविण्यासाठी मालमत्ता जप्त करावी, असे ठराव करण्यात आले.
कारखाना वाचविण्यासाठी सभासद, कामगार, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांनी एकत्रित येऊन लढण्याचा निर्धारही करण्यात आला. कारखान्याच्या धडक योजनेकडेही शेतकऱ्यांच्या पोकळ नोंदी मोठ्या प्रमाणात आहेत. या नोंदींच्या चौकशीची मागणीही करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Dismiss the director board of 'Vasantdada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.