अस्वच्छतेचा ठेकेदारी शाप
By Admin | Updated: July 3, 2014 01:01 IST2014-07-03T00:51:22+5:302014-07-03T01:01:37+5:30
सांगली बसस्थानकाची अवस्था : सर्वत्र घाणीचे साम्राज्य; ठेकेदार अधिकाऱ्यांवर शिरजोर

अस्वच्छतेचा ठेकेदारी शाप
अशोक डोंबाळे , सांगली : दररोज दहा हजारावर प्रवाशांची वर्दळ आणि पाचशेहून अधिक बसेसची दररोज ये-जा असलेल्या सांगलीच्या मध्यवर्ती बसस्थानकाला अस्वच्छतेचा ठेकेदारी शाप लाभला आहे. वर्षाकाठी लाखो रुपये ठेकेदाराच्या खिशात घालूनही बसस्थानकाचे बकालपण कसे दूर होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम न करता खिसे भरणारी ठेकेदारी आणि त्याला पाठबळ देणारे अधिकारीच या अस्वच्छतेला जबाबदार असल्याचे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
प्रवाशी वाढविण्यासाठी धडपडणाऱ्या महामंडळाच्या स्थानकांवर एवढ्या गैरसोयी असतील, तर प्रवासी एसटीकडे कसा वळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीच्या बसस्थानकावर जिल्ह्यातील दहा आगारांतून बसेस येतात; पण मुंबई, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, नांदेड, कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसेसची ये-जा चालूच आहे. रोज दहा हजारांहून अधिक प्रवासी बसस्थानकावर येत असतात. एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रवाशांची वर्दळ असतानाही बसस्थानकावरील स्वच्छतेकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. बसस्थानकावरील स्वच्छता करण्यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती केली असून, त्याला महिना २३ ते २५ हजार रुपये भाडे दिले जाते. प्रत्यक्षात ठेकेदाराकडून त्याप्रमाणात स्वच्छता केली जात नसल्याचे चित्र आहे. ठेकेदार स्वच्छता व्यवस्थित करतो की नाही, हे पाहूनच त्यांचे बिल काढण्याचा नियम आहे. यासाठी दोन सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि तीन वाहतूक अधिकारी नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत.
प्रवाशांच्या हिताकडे लक्ष देण्याऐवजी काही अधिकारी ठेकेदारांचे हित जपत असल्यामुळे प्रवाशांचा एसटीकडील ओढा कमी होत आहे. अधिकाऱ्यांच्या या बेफिकीरीमुळेच राज्यातील ५७ आगार सलग दहा वर्षे तोट्यात असून, आता ते बंद करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु, एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी हा उपाय ठरत नसून, ठेकेदारांना पोसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टोळ्यांना आगारातून हद्दपार करण्याची गरज आहे, असा सूरही कर्मचारी वर्गातून व्यक्त होऊ लागला आहे.
बिले मंजूरच कशी होतात?
ठेकेदार बसस्थानकावरील स्वच्छता करीत नसल्याचे सांगलीचे आगार व्यवस्थापक आर. एस. पाटील सांगत आहेत. तरीही ठेकेदाराचे बिल कनिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर करण्यामागचे गौडबंगाल काय?, असाही प्रश्न निर्माण होत आहे. बसस्थानकावर तर तीन-तीन दिवस स्वच्छता होत नाही. अनेकवेळा स्वच्छतेसाठी कामगार पाठविण्याबाबत ठेकेदाराला अधिकारी विनवणी करतात. तरीही ठेकेदार दाद देत नसल्याच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी आहेत.