नदीकाठच्या गावांनी आपत्ती प्रतिसाद कृती दल सज्ज ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:35+5:302021-06-21T04:18:35+5:30

सांगली : जिल्ह्यातील जनतेला पुराचा कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांत यंत्रणेत अनेक सुधारणा केल्या आहेत. कर्नाटकच्या ...

Disaster response teams should be ready by the riverside villages | नदीकाठच्या गावांनी आपत्ती प्रतिसाद कृती दल सज्ज ठेवावा

नदीकाठच्या गावांनी आपत्ती प्रतिसाद कृती दल सज्ज ठेवावा

सांगली : जिल्ह्यातील जनतेला पुराचा कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांत यंत्रणेत अनेक सुधारणा केल्या आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. त्यातून महापुराचे संकट आल्यास राज्य शासन झोकून देऊन काम करील, अशी ग्वाही देत सांगलीवाडीच्या धर्तीवर नदीकाठच्या गावागावात आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी केले.

सांगलीवाडी येथील तरुण मराठा बोट क्लबच्या वतीने ‘जयंत रेस्क्यू फोर्स’चे उद्घाटन व फायबर बोटी प्रदान कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, हरिदास पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, यंदा जिल्ह्यात पावसाळ्याने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात पुराची भीती आहे. महापूर येऊ नये, यासाठी कर्नाटकाशी समन्वय राखला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आलमट्टीतील विसर्गाबाबत चर्चा केली. जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यात २७५ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहेत. त्यातून दोन तासांत नदीतील पाणी पातळीचा अंदाज येईल. त्यातून लोकांना वेळीच स्थलांतर करता येईल. यंदा पूर येणार नाही, अशी आशा आहे; पण त्यातूनही संकट आले तरी शासनाकडून सांगलीला सर्वतोपरी मदत केली जाईल.

सांगलीवाडीतील तरुणांनी आपत्ती प्रतिसाद कृती दल उभारले आहे. पुराच्या काळात जनतेच्या मदतीला तरुणाई नेहमीच धावून गेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावागावात अशी कृती दले कार्यान्वित करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.

हरिदास पाटील म्हणाले की, २०१९ च्या महापुरात सांगलीवाडीला मोठा फटका बसला. चोहोबाजूंनी गावाचा संपर्क तुटला होता. लोकांच्या मदतीसाठी ‘जयंत रेस्क्यू फोर्स’ तयार केला आहे. केवळ पुरातच नव्हे तर सर्वच आपत्तीवेळी हे दल कार्यरत राहील, असे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, अपर्णा कदम, माजी नगरसेवक शेखर माने, पद्माकर जगदाळे, आकाराम कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

महापालिकेच्या यंत्रणेचे कौतुक

महापालिकेच्या वतीने महापुराशी मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंत्री पाटील यांना दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली पुस्तिकेचे प्रकाशनही केले. नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ वाढल्यास कोणता भाग पाण्याखाली जातो, याची सविस्तर माहिती पुस्तकात दिली आहे, तसेच निवारा केंद्रे, उपाययोजनांवरही महापालिकेने लक्ष दिले असल्याचे सांगत महापालिकेचे कौतुक केले.

Web Title: Disaster response teams should be ready by the riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.