पोलिसांच्या ताब्यातून चोरट्याचे पलायन

By Admin | Updated: January 8, 2017 23:47 IST2017-01-08T23:47:23+5:302017-01-08T23:47:23+5:30

मुंबई पोलिसांना हिसडा : सांगलीतील मुख्य बसस्थानकावर भरदिवसा घटना

The disappearance of the thieves from police custody | पोलिसांच्या ताब्यातून चोरट्याचे पलायन

पोलिसांच्या ताब्यातून चोरट्याचे पलायन


सांगली : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला एरंडोली (ता. मिरज) येथील रोहित बाबासाहेब धेंडे (वय १९) या चोरट्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले. सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर रविवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. धेंडे याने प्रातर्विधीचा बहाणा केल्यानंतर, पोलिसांना हिसडा देऊन तो पसार झाला. त्याच्या शोधासाठी तातडीने नाकाबंदी केली होती, पण तो सापडला नाही.
गेल्या महिन्यात मिरज ग्रामीण पोलिसांनी रोहित धेंडे यास अटक केली होती. त्याच्याकडून चोरीतील सात दुचाकी जप्त केल्या होत्या. नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याने मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ग्रामीण पोलिसांचा तपास झाल्यानंतर रोहितची जिल्हा कारागृहात रवानगी झाली होती. चार दिवसांपूर्वी कोपरखैरणे पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले होते. सांगली जिल्हा न्यायालयात त्यांनी रोहितचा ताबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार चार दिवसांपूर्वी त्यांना ताबा मिळाला होता. सांगली कारागृहातून त्याला मुंबईला तपासासाठी नेले होते. तपास झाल्यानंतर त्याला ६ जानेवारीला न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला होता.
रोहितला सांगली कारागृहातून ताब्यात घेतले असल्याने, कोपरखैरणे ठाण्यातील दोन हवालदार त्याला पुन्हा सांगली कारागृहात सोडण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईतून निघाले होते. रविवारी सकाळी ते सांगलीच्या मुख्य बस स्थानकावर उतरले. रोहितच्या हाताला बेडी होती. बसमधून उतरल्यानंतर त्याने पोटात कळ येत असून, प्रातर्विधीला जाणार असल्याचा बहाणा केला. पोलिसांनी त्याला शहरी बस थांब्याजवळील शौचालयाजवळ नेले. त्याच्या हाताची बेडी काढली. तो शौचालयात गेल्यानंतर दोन्ही पोलिस बाहेर थांबले होते. पाच मिनिटांनी तो बाहेर आला. त्याच्या हाताला पोलिस पुन्हा बेडी घालत होते. त्याचवेळी रोहितने दोन्ही पोलिसांना हिसडा मारुन पलायन केले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पण बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. (प्रतिनिधी)

Web Title: The disappearance of the thieves from police custody