नैसर्गिक नाल्यांची घाण, प्रशासनाची शान

By Admin | Updated: May 22, 2015 00:12 IST2015-05-21T23:19:48+5:302015-05-22T00:12:13+5:30

महापालिका कोमात : मान्सूनपूर्व नालेसफाईचे कागदोपत्री नाटक; आरोग्य विभाग खुशाल--लोकमत विशेष

The dirt of the natural drains, the glory of the administration | नैसर्गिक नाल्यांची घाण, प्रशासनाची शान

नैसर्गिक नाल्यांची घाण, प्रशासनाची शान

शीतल पाटील - सांगली --मान्सूनचा पाऊस उंबरठ्यावर असताना, महापालिकेची नाले व भोबे गटार सफाईची मोहीम संथगतीने सुरू आहे. मातीचे ढिगारे, वाढलेले पाणगवत, काटेरी झुडपांमुळे नाले अरुंद झाले आहेत. काही ठिकाणी नाल्यावर भराव टाकून तो वळविण्यात आला आहे. शहरातील मोठ्या गटारींची स्वच्छताही अधांतरीच आहे. त्यात प्रशासनाने नालेसफाईसाठी आवश्यक यंत्रसामग्री अद्याप उभी केलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला अपेक्षित वेग आलेला नसून, वेळेवर सफाईचे काम होईल, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
महापालिका हद्दीत एकूण ५४ नाले, तसेच मोठ्या गटारी आहेत. त्यापैकी ३९ नाले महत्त्वाचे मानले जातात. त्यांची लांबी अंदाजे ६० किलोमीटर इतकी आहे. वर्षातून एकदा नालेसफाई केली जाते. दरवर्षी होणाऱ्या या कामासाठी नेहमीच विलंब लावला जातो. यामागे नेमके कारण काय? दरवर्षी एक मेपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. यंदा मात्र मेपूर्वी नालेसफाई व्हावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यासाठी विलंब झाला आहे. आतापर्यंत १६ नाल्यांची सफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हे नाले पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत साफ करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेकडे दोन जेसीबी आहेत. त्यापैकी एक सांगलीला व दुसरा मिरजेला देण्यात आला आहे. मोठे नाले व गटारींच्या स्वच्छतेसाठी इतकी यंत्रणा पुरेशी आहे का? याचा साधा विचारही प्रशासनाने केलेला नाही. स्थायी समिती सभेत नालेसफाईवर वारंवार चर्चा झाली आहे. जेसीबी, पोकलँड व इतर सामग्री भाड्याने घेऊन तातडीने नालेसफाई करावी, असे निर्देशही दिले आहेत. पण कागदाच्या खेळात माहीर असलेल्या प्रशासनाने अद्याप पुरेशी यंत्रणा उभी केलेली नाही. दोन दिवसात नालेसफाईचे काम जोमाने सुरू होईल, असा दावाही केला जात आहे. पण त्याविषयी साशंकताच अधिक आहे.
कुपवाडमधून येणारा नाला थेट शेरीनाल्याला मिळतो. या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शेरीनाल्यावरही अतिक्रमणे वाढली आहेत. इस्लामपूर बायपास रस्त्याजवळून जाणारा हा नाला अनेक ठिकाणी वळविला आहे. काही ठिकाणी तर या नाल्याला गटारीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
मीरा हौसिंग सोसायटीजवळ नाल्यात झाडेझुडपे उगविली आहेत. शिंदे मळ्यातील नाला पुन्हा गाळात रुतला आहे. मातीचे ढिगारे, वाढलेले गवत, टाकाऊ कपडे, वस्तूंनी नाल्याचे रुपडेच पालटले आहे.
तीच अवस्था पद्मा टॉकीजच्या पिछाडीस असलेल्या नाल्याची आहे. कोल्हापूर रस्त्यावर तर नाला आहे की गटार, हेच समजत नाही. त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी, महापुराचा धोका अधिकच निर्माण होणार आहे. त्यासाठी महापालिकेने नालेसफाईची मोहीम तीव्र करण्याची गरज आहे. पण तशी इच्छाशक्ती महापालिका प्रशासनाकडे दिसून येत नाही. दरवर्षीचेच काम असल्याने पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, अशा अविर्भावात प्रशासन वावरत आहे.


घरात पाणी शिरण्याची भीती
मध्यंतरी टिंबर एरियातील अनेक कॉलनीत पावसाचे पाणी शिरले होते. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी डिसेंबर महिन्यातच नालेसफाईचे काम हाती घेतले होते. त्यानंतर सहा महिन्यात पुन्हा नाला साफ करण्यात आला. यंदा शिंदे मळा, गोकुळनगरच्या पिछाडीहून जाणारा हा नाला गाळाने तुडुंब भरला आहे. पाणगवत, काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगविली आहेत. या नाल्याची सफाई वेळेवर झाली नाही, तर पुन्हा टिंबर एरियातील कॉलनीत नाल्याचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य गटारींची स्वच्छताही संथगतीने सुरू आहे. शंभरफुटी रस्त्यावरील भोबे गटारीच्या सफाईचे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्टेशन चौक, मारुती रोड, झुलेलाल चौक या परिसरातील मोठ्या गटारींची स्वच्छता झालेली नाही. या गटारींतून प्लॅस्टिक, कचरा मोठ्या प्रमाणात साचतो. त्यात मोठा पाऊस झाला, तर गटारीतून पाणीच पुढे सरकत नाही. या गटारींच्या स्वच्छतेची गरज आहे.

Web Title: The dirt of the natural drains, the glory of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.