नुकसानीसह चौकशीचा खर्चही संचालकांवरच!

By Admin | Updated: December 24, 2014 00:23 IST2014-12-23T22:54:04+5:302014-12-24T00:23:11+5:30

जिल्हा बँक गैरव्यवहार : कागदपत्रांची छाननी, शुक्रवारी नोटिसा

The director of the investigation costs also with losses! | नुकसानीसह चौकशीचा खर्चही संचालकांवरच!

नुकसानीसह चौकशीचा खर्चही संचालकांवरच!

सांगली : जिल्हा बँकेतील सव्वाचार कोटी रुपयांच्या नुकसानीप्रकरणी उद्यापासून कागदपत्रांची छाननी होणार आहे. छाननीनंतर शुक्रवारी संचालकांना नोटिसा बजाविल्या जाणार असून, नुकसानीच्या रकमेसह चौकशीच्या खर्चाची जबाबदारीही संचालकांवर निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँकेत २००१ ते २०१२ या कालावधित ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका कलम ८३ खालील चौकशी अधिकारी तथा मिरजेचे उपनिबंधक मनोहर माळी यांनी ठेवला आहे. यात नियमबाह्य, अनावश्यक खर्च, सवलत, इमारत बांधकामे, बचत गटाला दिलेले मानधन, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, निवृत्त कर्मचाऱ्यांवरील खर्च, संचालकांचा अभ्यास दौरा, संगणक खरेदी, सोसायटीला ओटीएसखाली दिलेली सवलत, लिपिक व शिपायांची भरती यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
माळी यांनी चौकशीचा अहवाल कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांना सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ नुसार दोषी संचालक व तत्कालीन अधिकाऱ्यांवर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे
यांची नियुक्ती करण्यात आली
आहे.
काल सोमवारी कोल्हापुरे यांनी जिल्हा बँकेस भेट देऊन कागदपत्रांची मागणी केली. यात ठपका ठेवलेल्या प्रकरणाचा टेस्ट आॅडिट व अनुषंगिक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. उद्या बुधवारी जिल्हा बँकेकडून ही कागदपत्रे कोल्हापुरे यांच्या हाती सुपूर्द केल्या जातील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर कोल्हापुरे यांच्याकडून या कागदपत्रांची छाननी होऊन शुक्रवारी संचालकांना नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी संचालकांना १५ दिवसांची मुदत मिळेल. या कालावधित वाढही होऊ शकते. संचालकांचे म्हणणे नोंदविल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची जबाबदारी निश्चित केली
जाईल. यात चौकशीच्या खर्चाचाही समावेश असेल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)


सव्वाचार कोटींच्या नुकसानीची प्रकरणे
प्रधान कार्यालय रंगकाम, दुरुस्ती व पोर्च बांधकामात ४.६३ लाख, सावळज शाखा इमारत बांधकामात ९९ हजार, मार्केट यार्ड आटपाडी शाखा इमारत बांधकाम २८ हजार, बँक गॅरंटी शुल्क परतीचा व्यवहार २१६.५५ लाख, वाळवा तालुका बचत गट स्वयंसहाय्यता संघास धोरणबाह्य दिलेले मानधन ६३.४७ लाख, निवृत्त अधिकारी जामदार व पाटील यांना सेवेत पुन्हा घेऊन पगारावर केलेला खर्च ६.८१ लाख, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी ४.१७ लाख, आष्टा पश्चिम भाग सोसायटीमार्फत ओटीएस खाती नियमबाह्य सूट ४६ लाख, संचालक मंडळ अभ्यास दौरा ९८ हजार,संगणक खरेदी ७३.६७ लाख असे नुकसान झाले आहे.

Web Title: The director of the investigation costs also with losses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.