कुटिरोद्योग आणि डिजिटल मार्केटिंगची दिशा बनली आशेचा नवा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:05+5:302021-02-23T04:42:05+5:30
कठीण समय येता कोण कामास येतो, याचा परिचय कठीण वेळ आणि प्रसंग याला सामोरे गेल्याशिवाय कळत नाही. असाच कठीण ...

कुटिरोद्योग आणि डिजिटल मार्केटिंगची दिशा बनली आशेचा नवा किरण
कठीण समय येता कोण कामास येतो, याचा परिचय कठीण वेळ आणि प्रसंग याला सामोरे गेल्याशिवाय कळत नाही. असाच कठीण प्रसंग वर्षभरापूर्वी कोरोनासारखा आजार हा संपूर्ण जगात आला आणि त्याचा प्रभाव अजून आहेच. या आजाराने अनेक लोकांचे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी कित्येकांनी कुटिरोद्योग मार्ग अवलंबून स्वतःचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दिशा ठरवली. त्याचबरोबर काळानुसार नवीन गोष्टी शिकून घेतल्या आणि परिस्थिती कितीही कठीण जरी असली, तरी यातून आशेचा एक किरण असतोच, हे साध्य करून दाखविले.
कोरोना आला आणि याचा सर्व लोकांच्या नोकरी आणि धंदा यावर परिणाम झाला. शहरातील मोठे उद्योग-धंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवावे लागले. अचानक सगळं घडत गेले. कोरोनाच्या भीतीने परदेशात असणारे, शहरात असणारे लोक हे आपल्या गावाकडची वाट धरू लागले. पण गावात आलं तरी काही तरी काम असणे गरजेचे होते, म्हणून आता काय करता येईल, यावर काय मार्ग काढता येईल, असे अनेक संधीचा शोध घेऊ लागले. घरी बसून विविध प्रयोग करणे आणि असे बरेच काही चालू झाले. महिलांनीदेखील घरच्या-घरी लहान-मोठी काम केली. कुटुंबाचा थोडा फार खर्च सांभाळला. शिवाय गरजू लोकांना मदत करून सामाजिक कार्याला हातभार लावला आणि हे सर्व करीत असताना कुटुंबालादेखील सांभाळले. मास्क तयार करणे, जेवणाचे डबे पोहोचविणे हे तर झालेच, पण याशिवायदेखील अनेक कुटिरोद्योग सुरू केले.
ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली, तो घरात निवांत होता; पण ज्याें हातावर पोट त्यांचे खूप हाल झाले. शहरात राहून सवय, त्यामुळे तेथील काम वेगळे आणि गावात परतले तर येथील काम जमेना, अशी स्थिती उत्पन्न झाली. काहींना कधीही न केलेली कामे करायला लागली. काहींनी वेगवेगळ्या प्रकारच्या हातगाड्या चालू केल्या, तर काहींनी आपल्या शिक्षणाचा आणि कलेचा वापर करून अनेक शोध लावले. लॉकडाऊनमध्येदेखील अनेक जागतिक पातळीवर स्पर्धा झाल्या. काहींनी त्या स्पर्धेत भाग घेऊन देशाचे नाव सातासमुद्रापार नेले. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘ग्लोबल टिचर’ पुरस्काराने सन्मानित झालेले रणजितसिंह डिसले गुरुजी होय. ज्यांनी जगापुढे एक आदर्श ठेवला. इंटरनेट वापरात लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर खूप फरक पडला. लॉकडाऊनपासून इंटरनेट वापर खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण ‘वर्क फ्रॉम होम’ आणि मुलांचा ‘ऑनलाईन अभ्यास’ सुरू झाला. डिजिटल मार्केटिंग ॲप्स, यू ट्यूब, ब्लॉग, फेसबुक अशा अनेकप्रकारच्या गोष्टी सोशल मीडियातून शेअर होऊ लागल्या. यामुळे नवनवीन उद्योगांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू लागली. कुटिरोद्योग आणि लघुउद्योग हे मोठ्या प्रमाणावर असणे किती गरजेचे होते, हे या घडीला सर्वांना समजले आहे. लघुउद्योगांमध्ये मनुष्यबळ खूप लागते. त्यामुळे इथे प्रत्येकाला कामाच्या संधी उपलब्ध होत असतात; पण कोरोना काळात असे अनेक लघुउद्योग बंद झाले. काही लघुउद्योग हे आता नव्याने सुरू होत आहेत, तर काही लघुउद्योग हे आर्थिक अडचणीत आहेत. यामध्ये सध्या खरी गरज ही प्रत्येकाला कामाची आहे. कारण शिक्षण घेतलंय खरं; पण नोकरीच्या संधी नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे लघुउद्योगांना अधिक वाव मिळणे अपेक्षित आहे. याने प्रत्येक हाताला काम मिळेल आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी हातभार लागेल.
कुटिरोद्योग हा घरबसल्या, घरातील सर्वांसाठी आपल्या सोयीने आणि वेळेनुसार काम करता येणारा उद्योग आहे. कुटिरोद्योगाचे ग्रामीण आणि शहरी असे दोन प्रकार करता येतील. ग्रामीण भागात शेतीला आणि शहरी भागात नोकरी व्यवसायाला जोडधंदा म्हणून कुटिरोद्योग केले जातात. लॉकडाऊनच्या काळात शहरातील कामे ठप्प होती, मात्र गाव-खेड्यातील लोक आपली रोजची कामे करत होते आणि चालू होती. लॉकडाऊन झाल्याने शहरात गेलेले लोक गावाकडे वळू लागले, शेती करू लागले. एवढेच नाही, तर शिक्षणाचा वापर करून आधुनिक शेती करू लागले. लॉकडाऊनच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत भरघोस उत्पन्न घेतल्याची उदाहरणे घडली आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतीतील मालावर प्रक्रिया उद्योगदेखील उभारले. शेतीला जोडधंदा आणि याशिवाय कुटिरोद्योगांमध्ये हातमाग, बुरूडकाम, वेतकाम, बांबूकाम, मधमाशापालन, विड्या वळणे, घोंगड्या विणणे, गूळ तयार करणे त्याचबरोबर परंपरागत कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम, तेलघाण्या, चर्मोद्योग, विणकर अशी काम कुटिरोद्योगात केली जातात. ही कामे गामीण भागात चालू होती. कमी भांडवलात अधिक नफा असे हे कुटिरोद्योग आहेत. या उद्योगांना अद्याप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
भारत हा परंपरागत कलाकौशल्याचा देश असल्याने परदेशातही याचे कौशल्य जात होते; पण यंत्रसामग्री आली, स्पर्धा वाढल्या आणि या कला लोप होत गेल्या; पण कोरोना काळात या कला परत नवीन पध्दतीने सुरू झाल्या. कारण कलाकुसरीची कामे ही व्यक्तिगत पसंतीनुसार तयार केली जातात; त्यामुळे कुटिरोद्योगांचे स्थान हे कितीही यंत्रसामग्री आली तरी ते आपले स्थान टिकवून आहे. जुन्या- नव्या गोष्टी शिकण्यासाठी तंत्रज्ञानदेखील खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण लॉकडाऊनमध्ये कुटिरोद्योगातून तयार केलेले कौशल्य, वस्तू आणि इतर गोष्टी या इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी, ते विकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला गेला. यामुळे कित्येकजण आपला नवीन व्यवसाय चालू करू शकले. त्याचबरोबर हँड सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर, पीपीइ कीट, व्हेंटिलेटर आदी हॉस्पिटलसंबंधित गोष्टी या सर्वसामान्य लोकांना माहिती देखील नव्हत्या त्या कोरोनामुळे घराघरात पोहोचल्या. याचीदेखील मागणी वाढत गेली. तो एक लॉकडाऊनमध्ये काहींना आर्थिक हातभार लागला, असे म्हणता येईल. आजवर असलेल्या व्यवसायातील संधी आणि इतर विचार करता, या कालावधीत अनेक नवीन व्यवसाय तरुणांच्या आणि पर्यायाने हाताला काम नसलेल्या कुटुंबांनना मिळाले. यातून आर्थिक हातभार मिळत जगण्याची नवी उर्मीही मिळाली.
लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी बिनपगारी काम केले, असे म्हणायला हरकत नाही. पण याचा फायदा त्यांना भविष्यात नक्की होणार आहे. कारण घरी राहून वेळेचा दुरुपयोग न करता काहींनी रस्ते केले, तर काहींनी पाणी अडविण्यासाठी खड्डे काढले, काहींनी विहिरी खणल्या, तर काहींनी झाडे लावली आणि वेळ सत्कारणी लावला. ही कामे छोटी वाटत असतील; पण याचा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करता खूप मोठी आहेत. पर्यावरण चांगले असेल, तर सजीवसृष्टी चांगली, परिणामी आपल्या हिताची म्हणता येईल.
अचानक गेलेल्या नोकऱ्या, काम यामुळे नवीन व्यवसाय म्हणून ई-कॉमर्सकडे लोक जाऊ लागले. ई-कॉमर्सचा जास्तीत-जास्त वापर करायला पुढील दहा वर्षे तरी लागले असते; पण कोविडमुळे ते तीन महिन्यांत वाढले गेले. हा एक सर्व गोष्टीतील प्लस पॉईंट म्हणता येईल. यामुळे अनेक ज्येष्ठवर्गीय लोक ज्यांना यातील काहीच माहीत नव्हते, त्यांनीदेखील हे सर्व शिकून घेतले. ई-कॉमर्समध्येही खूप करिअरच्या संधी आहेत. हेच कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांनी लक्षात घेऊन नवनवीन ॲप चालू केले. त्यामुळे अनेकांनी घरबसल्या खरेदी-विक्रीचे काम करू केले. सोशल मीडिया मार्केटिंगसाठी Facebook Massenger marketing, instagram, youtube channel, micro video marketing, twitter, linked in अशी अनेक नवीन इन्कम स्रोत वाढत आहेत. ऑनलाईन ट्रेडिंग, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल डिव्हाईस, डिजिटल प्लॅटफॉर्म , डिजिटल मीडिया, डिजिटल डेटा, डिजिटल टेक्नॉलॉजी, फ्रीलान्सिंग, वेबिनार, ऑनलाईन मिटिंग, ऑनलाईन टिचिंग-लर्निंग चालू झाले, यामुळे वेळ आणि पैशाचीदेखील काही प्रमाणात बचत होऊ लागली. यामुळे अनेक लोकांनी जुन्या गोष्टींबरोबरच नवीन गोष्टी शिकून घेतल्या. कोविडमुळे डॉक्टर्स, नर्स, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना देखील खूप त्रास सहन करावा लागला. मात्र यातूनच कोरोनावर मात करण्यासाठी अनेक शोध लावले गेले. अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. कोरोनावर लस शोधणे, हे संशोधकांसमोर आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून अनेक संशोधकांनी अनेक शोध लावले आणि लस शोधून काढली. लोकांना शिस्त आणि खरी समाजसेवा काय असते आणि कशी असते, हे कळाले. लॉकडाऊनमुळे किती तरी गोष्टी विस्कळीत झाल्या; पण जीवनाची खरी घडी कशी असावी, हा धडा मात्र कोरोनाने सर्वांना शिकवला.
चौकट
हाताला काम, दुसऱ्यांना रोजगार
कोरोना कालावधीतील एकूणच जीवनमान आव्हानात्मक असेच होते. या कालावधित जगण्याची नवी दिशा अनेकांना मिळाली. या अडचणीतही अनेकांनी केवळ आपल्या कुटुंबापुरते काम न करता आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांनाही संधी मिळवून दिली. त्यामुळे स्वत:सह इतरांनाही रोजगार मिळाला.
स्नेहलता वर्धमाने. हरिपूर, सांगली