इस्लामपूर बाजारात महिलांची ‘धूम’ टोळी
By Admin | Updated: November 17, 2014 23:24 IST2014-11-17T23:07:58+5:302014-11-17T23:24:05+5:30
नागरिक त्रस्त : मोबाईल, दागिने लंपास करण्याचे सर्रास प्रकार

इस्लामपूर बाजारात महिलांची ‘धूम’ टोळी
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी बाजार भरतो. या बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन सराईत चोरट्या महिलांनी धुमाकूळ घातला आहे. या महिला बाजारात भाजीपाला घेण्याचा बहाणा करीत पुरुषांच्या खिशातील मोबाईल आणि महिलांच्या गळ्यातील दागिने सहजपणे लंपास करीत आहेत. ही महिलांची धूम टोळी सातारा जिल्ह्यातील असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.गेल्या वर्षभरात महागड्या किमतीचे मोबाईल महिलांनी लंपास केले आहेत. गेल्या आठवडाभरात डॉ. संग्राम पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश जाधव, संजय पाटील यांच्यासह अनेकांचे मोबाईल बाजारातून चोरीला गेले आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
या चोरट्या महिलांच्या हातात बाजाराची पिशवी, त्यात भाजीपाला असल्याने बाजारात कोणालाही संशय येत नाही. त्यांच्यासोबत काही पुरुषही असतात. या महिलांनी मोबाईल चोरल्याची खात्री पटूनही त्यांना पकडणे शक्य होत नाही. जाब विचारल्यास त्या महिला उलट, छेड काढल्याचा आरोप करुन संबंधिताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुरुष सहसा या महिलांच्या नादाला लागत नाहीत. याच महिला बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारीही करतात.
अनेकांनी मोबाईल चोरीची तक्रार पोलिसांत केली आहे. मात्र या चोरट्यांचा छडा न लागल्याने मोबाईल, दागिने व पाकीटमारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. (वार्ताहर)
महिला पोलिसांच्या नेमणुकीची मागणी
आठवड्यातील रविवार व गुरुवार या बाजारादिवशी वाळवा बझारसमोर वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक असते. ही कोंडी काढण्याच्या कामात व्यस्त असलेल्या पोलिसाला बाजारात लक्ष ठेवता येत नाही. याचाच फायदा उठवत महिलांकडून मोबाईल चोरी केली जाते. बाजारात खासगी वेशातील महिला पोलिसांची नेमणूक केल्यास अशा चोऱ्यांवर आळा बसू शकतो.
बाजार आणि बसस्थानकावरील चोरट्या महिलांचा म्होरक्या इस्लामपूर शहरातीलच असल्याचा संशय आहे. हा म्होरक्या पोलिसांनाही ‘मॅनेज’ करतो, असेही बोलले जात आहे. हा म्होरक्या बसस्थानकामागील एका ठिकाणी बसून मोबाईल व पैशाची विभागणी करीत असल्याचे समजते.